सोलापूर

सोलापूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी जिल्हा प्रशासन कटिबध्द  – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

 

सोलापूर :

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांचे मार्गदर्शनाखाली शिक्षण,उद्योग, कृषि,प्रक्रिया उद्योग व पर्यटन आदी सर्व क्षेत्रातील सोलापूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी जिल्हा प्रशासन कटिबध्द असल्याचा विश्वास सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात व्यक्त केला.

याप्रसंगी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले,पोलीस आयुक्त राजेंद्र माने,पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे,अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, पोलीस उपायुक्त डॉ.दीपाली काळे यांचेसह विविध विभागांचे प्रमुख शासकीय अधिकारी,विभाग प्रमुख, स्वातंत्र्यसैनिक,ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी,पालक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यासमयी बोलताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर पुढे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.राधाकृष्ण विखे-पाटील त्याचबरोबर,जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या शाश्वत विकासाचे काम हाती घेण्यात आले असून जिल्हा वार्षिक योजनेतून २०२३-२४ साठी ६५८.२३ कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा प्रस्तावित केला आहे आणि या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. लोकप्रतिनिधी,माजी विद्यार्थी व तज्ज्ञ यांच्याशी समन्वय ठेवून सोलापूर जिल्ह्याचा सर्वंकष विकास आराखडा तयार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले. जिल्हाधिकारी शंभरकर पुढे म्हणाले की,जिल्ह्यात मुबलक पाणी उपलब्ध होऊन सिंचन क्षमता वाढेल,यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. अमृत सरोवर अभियानातून १६४ पैकी १०८ कामे पूर्ण झाली असून जलयुक्त शिवार अभियान १.० मध्ये सोलापूर जिल्ह्यातील ९३३ गांवांमध्ये विविध कामे पूर्ण करण्यात आली आहेत.जलयुक्त शिवार अभियान २.० च्या पहिल्या टप्प्यात २३२ गांवे जलयुक्त करण्याचे नियोजन असून प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत सुमारे २६ गांवांमध्ये ३६ हजार हेक्टर क्षेत्र अंतर्गत ३२ कोटी रुपयांची पाणलोट विकासाची कामे प्रस्तावित घेण्यात आली आहेत,अशी माहिती देताना त्यांनी “चला जाणूया नदीला” या अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप देणाऱ्या सर्वांचे आभारही व्यक्त केले.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यावेळी पुढे सांगीतले की, सोलापूर जिल्ह्याच्या चारी बाजूंनी चौपदरी महामार्गांचे जाळे निर्माण झाल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाचा वेग वाढत असून सूरत-चेन्नई महामार्गासाठी वेळेत भूसंपादन पूर्ण करण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले आहे. हा मार्ग सुरी झाल्यानंतर जिल्ह्यात आणखी नवीन उद्योगधंदे येतील. कुंभारी येथील असंघटित कामगारांसाठी ३० हजार घरांच्या प्रकल्पांतर्गत कामांचा व स्मार्ट सिटी योजनेत महानगर पालिकेतर्फे झालेल्या कामांचा परामर्शही त्यांनी यावेळी घेतला. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आलेल्या महाआवास अभियानातील कामगिरीबद्दल आणि आरोग्य विभागामार्फत”माता सुरक्षित तर घर सुरक्षित” हे अभियान यशस्वीपणे राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी शंभरकर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.तसेच लोकाभिमुख प्रशासनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त सुरु करण्यात आलेले मुख्यमंत्री सचिवालय कक्ष व पालकमंत्री संपर्क कार्यालय यांची माहिती देऊन सेवा पंधरवड्यामध्ये केलेल्या कार्यवाहीचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. त्याचबरोबर, महसूल भवन इमारत,ई ऑफिस प्रणाली, पोलीस विभाग पदभरती, भूमि अभिलेख विभागाने खरेदी केलेल्या रोव्हर मशीन यामुळे प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळेल,असा विश्वासही श्री.शंभरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रजासत्ताक दिनानिमीत्त सुरुवातीस, भारताच्या संविधानातील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. त्यानंतर परेड निरीक्षण व परेड संचलन करण्यात आले. परेड संचलनात राज्य राखीव पोलीस बल,जलद प्रतिसाद पथक, गृहरक्षक दल,पोलीस विभाग महिला व पुरुष पथक,शहर वाहतूक शाखा, एनसीसी पथक,सोलापूर शहर वाद्यवृंद पथक तसेच विविध विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनीही आपला सहभाग नोंदविला. त्याचबरोबर श्वान पथक, फॉरेन्सिक सायन्स व्हॅन, बीडीडीएस,महारक्षक,वज्र वाहन,वरुण वाहन,वन,आरोग्य, कृषि, महिला व बालकल्याण विभाग,अग्निशमन,परिवहन विभागाकडील वाहने,रुग्णवाहिका,उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सुरक्षा कवच,मतदार जनजागृती रथ आदींचाही या संचलनात समावेश होता.

यावेळी,गृहरक्षक दलातील गुणवत्तापूर्ण सेवेकरिता राष्ट्रपती पदक प्राप्त एकनाथ सुतार तसेच महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धेत आर्चरी खेळामध्ये सुवर्णपदक मिळविल्याबद्दल महिला पोलीस नाईक अश्विनी गाजरे यांना सन्मानित करण्यात आले. पोलीस दलात विशेष सेवा पदक प्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.तसेच छ.शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारार्थी,जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी,जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कारार्थी,उत्कृष्ट सेवा पुरविणारी रुग्णालये,शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांचाही गुणगौरव यावेळी करण्यात आला.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button