सांगोल्याच्या नृसिंह गणेश तरुण मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासत राबविले समाजोपयोगी उपक्रम

सांगोला :

सांगोल्याच्या लोहार गल्ली येथील नृसिंह गणेश तरुण मंडळाने आपल्या २९ व्या गणेशोत्सवानिमित्त उत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत व गरजू घटकांना आधार देण्याचा उपक्रम राबवत दोन दिव्यांग बांधवांच्या नावावर मुदतठेव,दोन गरजू महिलांना शिलाई मशीन,एका गरजू कुटुंबाला शेळीचे वाटप,वृक्षारोपण तसेच झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार असे उपक्रम राबविले.गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक उत्सव साजरा न करता सामाजिक बांधिलकी जोपासत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविल्याने मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

मंडळाच्या वतीने फॅबटेक फाउंडेशनचे सर्वेसर्वा तथा उद्योगपती भाऊसाहेब रुपनर व डॉ.प्रभाकर माळी यांच्या सहकार्याने गरजू लाभार्थी विद्याराणी सिद्धेश्वर माळी यांना उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे,युवा नेते विजय पैलवान,दै.माणदूत एक्सप्रेसचे संपादक मोहन मस्के,सोमनाथ पैलवान यांच्या उपस्थितीत शेळी देण्यात आली.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळाने सांगोला शहरातील दोन दिव्यांग बांधवांच्या भविष्यासाठी प्रत्येकी ५ हजार रुपयांची मुदत ठेव ठेवली.तेजस संजय चौधरी व सतीश बनसोडे यांच्या नावावर क्रांतीज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्था,बनकरवाडी तसेच मेट्रिक्स ग्लोबल अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,सांगोला येथे प्रत्येकी ५ हजार रुपयांची मुदतठेव करण्यात आली. मंडळाचे मार्गदर्शक रामचंद्र अण्णा बनकर व भारत भाऊसाहेब गरंडे यांच्या विशेष सौजन्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

तसेच गरजू महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे या उद्देशाने,सामाजिक कार्यकर्ते रमेश अण्णा देशपांडे व सौ.सुचिताकाकू दिलीप मस्के यांच्या सहकार्याने चिंचोली येथील गिरिजा चव्हाण तसेच सांगोला शहरातील अर्चना काशिलिंग बंडगर या दोन गरजू महिलांना पंचायत समितीच्या सभापती पूनमताई इंगोले व नगरसेविका राणीताई माने यांच्या हस्ते शिलाई मशीन देण्यात आले. तसेच मंडळाच्या वतीने झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेऊन मोफत औषधोपचार करण्यात आले व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण उपक्रमही राबविण्यात आला.

हे सर्व उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सुनील मस्के,उपाध्यक्ष प्रथमेश भुजबळ,खजिनदार संतोष लिगाडे,सचिव सौरभ शिर्के,सहखजिनदार युवराज पैलवान यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
===================================