हजार कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल
=========================
सूर्योदय अर्बन व एलकेपी मल्टीस्टेटच्या वार्षिक सभेत 10 टक्के डिव्हिडंड जाहीर
सांगोला :
मागील अनेक वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातील हजारो व्यवसायिक,पशुपालक व शेतकरी यांचा आर्थिक कणा समजली जाणारी सूर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार होऊन यापुढे या संस्थेचे ‘कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य’ असे अधिकृतपणे घोषित झाले असल्याने सूर्योदय महिला अर्बनचा विस्तार आता राज्यभर पसरणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी दिली.

सूर्योदय अर्बन,सूर्योदय अर्बन महिला आणि एलकेपी मल्टीस्टेट या तिन्ही संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा सांगोला शहरातील सूर्योदय मॉल शेजारील सूर्योदय बँक्वेट हॉल येथे सभासद बंधू-भगिनींच्या उपस्थितीत अत्यंत उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाली.यावेळी या सर्व संस्थांचे संस्थापक व सूर्योदय उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अनिलभाऊ इंगवले हे अध्यक्षपदावरून बोलत होते.ते पुढे म्हणाले की,सुमारे 16 शाखांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेच्या शाखा पुढील काळात महाराष्ट्राच्या विविध भागात उघडण्यात येणार असून माझे या क्षेत्रातील जीवाभावाचे सहकारी डॉ.बंडोपंत लवटे,जगन्नाथ भगत गुरुजी व सुभाष दिघे गुरुजी यांच्या सहकार्याने तसेच आमच्या असंख्य सभासदांच्या आशीर्वादाने व कुशल कर्मचारी वृंदांच्या साथीने गतवर्षी सूर्योदय अर्बन,सूर्योदय अर्बन महिला व एलकेपी मल्टीस्टेट या तिन्ही संस्थांनी मिळून सुमारे 550 कोटींचा व्यवसाय यशस्वीरित्या पूर्ण केला आहे आणि यावर्षी देखील या तिन्ही संस्थांचे मिळून सुमारे 1000 कोटींच्या व्यवसायांचे उद्दिष्ट आम्ही समोर ठेवले असून आमचे सन्माननीय ठेवीदार आणि कर्जदार त्याचबरोबर आमच्या सर्व सभासद बंधू-भगिनींच्या सहकार्याने हे उद्दिष्ट आम्ही निश्चित पूर्ण करु,अशी अपेक्षाही यावेळी अनिलभाऊ इंगवले यांनी व्यक्त केली.
सूर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड,सोलापूर या संस्थेच्या चेअरमन सौ.अर्चना अनिल इंगवले यांनी बोलताना सांगितले की,संस्थेने गतवर्षी जिल्ह्याच्या परिसरामध्ये दहा नवीन शाखांची उभारणी करत सुमारे 16 शाखांच्या माध्यमातून संस्था वाटचाल करीत असताना यावर्षी संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र झाल्यामुळे राज्याच्या विविध भागात आणखी काही शाखांची उभारणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सुरुवातीला प्रास्ताविकात सूर्योदय अर्बनचे माजी चेअरमन जगन्नाथ भगत यांनी उपस्थित सभासदांना आर्थिक सक्षमतेकरिता बचती बाबतची अनेक उदाहरणे सांगत आपल्या सोबत असलेले या संस्थांचे अतूट नाते कायम आबाधित राहील असाच या संस्थांचा कारभार सातत्याने केला जात असल्याचे सांगितले.या संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांचा दोन लाख रुपयांचा विमा उतरला असून संस्थेच्या वतीने अनेक समाजोपयोगी आणि राष्ट्रहिताचे उपक्रम राबवून संस्थेने सर्व सभासदांसहित समाजातील असंख्य घटकांच्या हृदयात मानाचे स्थान निर्माण केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मंचावर एलकेपी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले,सूर्योदय अर्बनचे चेअरमन डॉ.बंडोपंत लवटे,महिला अर्बनच्या चेअरमन सौ.अर्चनाताई इंगवले,सहसंस्थापक जगन्नाथ भगत गुरुजी,एलकेपी मल्टीस्टेटचे व्हा.चेअरमन सुभाष दिघे गुरुजी,लेखापरीक्षक उमा उंटवाले त्याचबरोबर तिन्ही संस्थांचे अधिकारी राजकुमार बहिरे,अण्णासाहेब इंगवले व रेशमा कमले इ.मान्यवर उपस्थित होते.तसेच महिला अर्बनच्या व्हाईस चेअरमन सौ.ज्योती भगत व संचालिका सौ.मीनाक्षी दिघे,संचालिका पूजा इंगवले, अंजना भावके त्याचबरोबर सूर्योदय परिवाराचे संचालक संतोष घाडगे,संतोष इंगवले,मोहन इंगवले,महेश नष्टे, नारायण घाडगे,सुभाष अनुसे यांच्यासह सभासद बंधू, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तीनही संस्थांचे चेअरमन आणि सचिव यांनी विषय पत्रिकेनुसार सर्वसाधारण सभा यशस्वीपणे पार पाडत तिन्ही संस्थांचे सर्व विषय हजारो सभासदांच्या उपस्थितीत आणि प्रचंड टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले. राज्यभर सर्वत्र पसरलेल्या अनेक शाखांच्या परिसरातून या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सभासदांची विशेषतः महिला भगिनींची मोठी उपस्थिती होती.त्या त्या शाखेच्या परिसरामध्ये ‘संस्था माझी आणि मी संस्थेचा’ अशी अत्यंत सकारात्मक भावना जपत संस्थेच्या उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या काही उत्कृष्ट सभासद ग्राहकांचा ट्रॉफी देऊन यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रमानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.सूर्योदय परिवाराचे संचालक प्रशांत पाटील यांनी यासमयी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.
=========================
तिन्ही संस्थांच्या सभासदांसाठी 10 टक्के डिव्हिडंड जाहीर :
महाराष्ट्र व कर्नाटक अशी दोन राज्ये कार्यक्षेत्र घेऊन सुमारे 43 शाखांच्या माध्यमातून उत्कृष्टपणे कारभार करणारी एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तसेच सूर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि सूर्योदय अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थांचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी या तीनही संस्था उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे अत्यंत नफ्यात असल्याचे सांगत सर्व संस्थांच्या सुमारे अडीच हजार रुपयांच्या पुढे शेअर्स असलेल्या सभासदांना भेटवस्तू म्हणून यावर्षी दिवाळीत पाच किलो साखर देणार असल्याचे देखील जाहीर करुन या तिन्ही संस्थांच्या सभासदांसाठी 10 टक्के डिव्हिडंडही जाहीर केला.
=========================
More Stories
सहकारमंत्री नाम.बाबासाहेब पाटील शनिवारी देणार जवळा विकास सोसायटीला भेट
गणेशोत्सवातील महाप्रसादासाठी FDA नोंदणी बंधनकारक – डॉ.मंगेश लवटे
घरपट्टीत कसलीही दरवाढ नाही,ही तर वाढीव बांधकामामुळे करवाढ – नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने