पाणी व चारा टंचाईवर तातडीने उपाययोजना करा – आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख
सांगोल्यात आमदार डॉ.बाबासाहेबांनी घेतला विभागनिहाय आढावा

सांगोला :
पावसाअभावी सांगोला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील तब्बल २६ गावांमध्ये जनावरांसाठी एकाही दिवसाचा चारा उपलब्ध नसल्याचे समोर आले असून २२ गावांमध्ये केवळ ४० दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे.उर्वरित गावांमध्येही जेमतेम दीड ते दोन महिने पुरेल इतकाच चारा उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी दिली.या गंभीर परिस्थितीची दखल घेत पाणी आणि चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी
अधिकाऱ्यांना दिले.
सांगोला पंचायत समितीच्या बचत भवन येथे पाणी व चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी आमदार डॉ.देशमुख यांनी तालुक्यातील पाणीपुरवठा, चारा उपलब्धता आणि टंचाई निवारणासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.यावेळी बोलताना आमदार डॉ.देशमुख म्हणाले की,जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नकाशावर उभी रेषा मारल्यास पूर्वेकडील भागात अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाची तर,पश्चिमेकडील भागात पावसाअभावी कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमान कमी राहिले असून त्याचा परिणाम पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्यावर झाला आहे.शासनाने टंचाई निवारणासाठी विविध विभागांना स्वतंत्र जबाबदाऱ्या देऊन आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यानुसार,संबंधित विभागांनी समन्वयाने काम करुन टंचाईग्रस्त गावांना तातडीने दिलासा द्यावा,असे सांगितले.
ते पुढे म्हणाले की,म्हैसाळ योजनेतून मिळणाऱ्या पाण्यापासून मुख्य 7 गावे व नव्याने समाविष्ट केलेली 8 गावे वंचित राहणार नाहीत, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. तसेच ज्या गावांनी पाण्याची मागणी केली आहे,त्या गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेतून सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा. भविष्यात ज्या गावांना पाणीटंचाईची अडचण निर्माण होईल,त्या ग्रामपंचायतींनी तातडीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाणीपुरवठ्याची मागणी नोंदवावी,अशा गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने कार्यवाही केली जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.त्यामुळे,ग्रामपंचायतींनी संभाव्य पाणीटंचाईचा विचार करुन वेळीच मागणी नोंदवावी,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात चारा वाहतुकीवर बंदी घातल्याने स्थानिक पातळीवर चारा उपलब्ध करुन देण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.तालुक्यातील जनावरांची उपासमार टाळण्यासाठी चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात चारा छावण्या अथवा चारा डेपो सुरु होण्याची शक्यता आहे.मात्र, तोपर्यंत जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन प्रशासनाने गांभीर्याने करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.
सदर बैठकीस सांगोल्याच्या तहसीलदार बाळूताई भागवत,मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, गटविकास अधिकारी योगेश कांबळे,कृषी अधिकारी दीपाली जाधव यांच्यासह शासकीय अधिकारी,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समितीचे सदस्य,विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=========================
डॉ.बाबासाहेबांनी अधिकाऱ्यांना दिले तत्परतेने कार्यवाही करण्याचे निर्देश :
पाणी व चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी महसूल,कृषी,पाणीपुरव ठा,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पंचायत समिती,नगरपालिका आदी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.प्रत्येक विभागाकडून टंचाई निवारणासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली.पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, टँकरद्वारे पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा उपलब्धता तसेच भविष्यात उदभवणाऱ्या संभाव्य टंचाईच्या परिस्थितीचा विचार करुन आवश्यक नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या. सर्वच शासकीय विभागांनी समन्वय ठेवून नागरिकांना पाणी व चाऱ्यासाठी अडचणी येणार नाहीत,यासाठी तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देशही आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिले.
==============



