सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्याची यापुढे गय केली जाणार नाही – आम.डॉ.बाबासाहेब देशमुख
सांगोला :
सांगोला तालुक्यात यापुढे हुकूमशाही,दादागिरी, गुंडगिरी व भाईगिरी अजिबात चालू देणार नाही.स्व. आबासाहेबांच्या ५५ वर्षांच्या वैचारिक परंपरेनुसार सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेऊनच राज्यकारभार करु.कोणाची अडवणूक करणे अथवा वेठीस धरण्याचे प्रकार आता यापुढे चालणार नाहीत. सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या कोणाचीही यापुढे गय केली जाणार नाही,असा गर्भित इशारा नुतन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी दिला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.निवडणुकीत जेवढे मताधिक्य मिळाले,तेवढे वृक्षारोपण करण्याचा त्यांनी संकल्प केला असून शनिवारी मुंबईहून त्यांचे सांगोल्यात आगमन होताच त्यांना भेटण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.सर्वसामान्य नागरिक व कार्यकर्त्यांनी यावेळी हारतुरे ऐवजी रोपे देऊन आम.डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना नुतन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख पुढे म्हणाले की,तुमचा पाठिंबा आणि विश्वास हीच माझी ताकद आहे.जनतेच्या भल्यासाठी काम करणे,हेच माझे ध्येय असून,भविष्यातही मी तुमच्या सेवेसाठी तत्पर राहीन.आपले प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या,असे आवाहन करत निवडणुकीत मिळालेल्या यशाने आम्ही कधीही हुरळून जाणार नाही,असे सांगत आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबध्द राहीन,अशी ग्वाहीही आमदार डाॅ. बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी दिली.
यावेळी ते पुढे म्हणाले की,सांगोल्याच्या जनतेसमोर मी नतमस्तक होत असून हा विजय आमची जबाबदारी वाढवणारा आहे.स्व.भाई गणपतराव देशमुख यांच्याप्रमाणे माझ्यावरही सांगोल्यातील सर्वसामान्य जनतेने मोठा विश्वास दाखवलेला असून त्यामुळे आम्हाला मतदारसंघात खूप काम करावे लागेल,याची जाणीव होत आहे.जनतेने दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जावू देणार नाही.तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून आता जबाबदारी वाढली असून सर्वच गावांमध्ये शेतकरी कामगार पक्षाला चांगले यश मिळाले आहे.त्यामुळे,माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली असून आम्हाला इथून पुढे अधिक बारकाईने काम करावे लागेल.आम्ही जनतेच्या ऋणात राहू इच्छितो.जनतेच्या विश्वासाला तडा जावू दिला जाणार नाही,अशी खात्रीही आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी याप्रसंगी दिली.
—————————————————————————
माजी सैनिकांतर्फे सत्कार :
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा जय जवान माजी सैनिक सेवाभावी संस्था,सांगोला व कल्याणकारी संस्था,सांगोला तसेच आजी-माजी सैनिक संघटना वासुद-अकोला,चिणके,सोनंद,मांजरी,पाचेगाव,हंगिरगे,महिम, मानेगाव या संघटनांकडूनही विविध प्रकारच्या झाडांची रोपे देऊन सत्कार करण्यात आला.