जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील

कार्यतपस्वी आमदार कै.काकासाहेब साळुंखे-पाटील बहुउद्देशीय भवन,या नवीन वास्तूचे उदघाटन संपन्न

 

सांगोला :

              राजकारणात जय-पराजय होत असतात,एखाद्या पराजयाला खचून जाणारे साळुंखे-पाटील कुटुंबीय नाही. परंतु,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे शत्रू किती मोठा आहे ? यापेक्षा आपल्यातील फितूर किती आहेत ? हे ओळखायला सुरुवात केली आहे.पाठीमागून चर्चा उठवण्यापेक्षा आणि रडीचा डाव खेळण्यापेक्षा मैदानात येऊन सामना करावा,असे ठणकावून सांगत, जवळा गावच्या आणि चार वाड्याच्या विकासासाठी जेवढं काही करता येईल तेवढं केले जाईल.राजकारणाच्या पलिकडे जाऊन गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी साळुंखे-पाटील कुटुंबिय कधीही मागे हटणार नाही,अशी हमी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी दिली .

        कार्यतपस्वी आमदार कै. काकासाहेब साळुंखे-पाटील बहुउद्देशीय भवन,या नवीन वस्तूचा उदघाटन समारंभ तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व नागरिकांच्या आरोग्यासाठी जवळा गावाने घेतलेला ऐतिहासिक निर्णय दीपस्तंभ म्हणून सारे शिकूया,भारताचे दीपस्तंभ होऊया.25 फेब्रुवारी 2026 पासून रात्री 7 ते रात्री 9 पर्यंत जवळा गावातील मोबाईल आणि टीव्ही पूर्णपणे बंद,या संकल्पनेचा शुभारंभ मंगळवारी संपन्न झाला.यावेळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे बोलत होते.

            या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी,युवक नेते ॲड.यशराजे साळुंखे-पाटील,भाजपाचे नेते संभाजी तात्या आलदर,सरपंच सज्जन मागाडे, उपसरपंच नवाज खलिफा,अरुणभाऊ घुले सरकार, सुनीलआबा साळुंखे,ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय रसाळ यांच्यासह ग्राम पंचायतीचे आजी-माजी सदस्य,तंटामुक्तीचे पदाधिकारी,पोलीस पाटील,ज्येष्ठ मंडळी,नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना माजी आमदार दीपकआबा पुढे म्हणाले की,आत्मपरीक्षण करुन पुढे कामाला सुरुवात केली आहे. गावच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न सुरु असून, यामध्ये इथून पुढच्या काळात कोणताही सरकारी कागद आणण्यासाठी आता सांगोल्याला हेलपाटे मारावी लागणार नाहीत.कारण प्रत्येक कार्यालय आता जवळ्यात एका छताखाली सुरु होत आहे. त्यामुळे जवळा आणि जवळच्या वाड्यावस्त्यावरील नागरिकांची गैरसोय निश्चितपणाने दूर होणार आहे.सध्या,एक फूट जागा कोण कोणाला देत नाही,अशा परिस्थितीत साळुंखे-पाटील कुटुंबीयांनी प्रमुख चौकातील जागा यासाठी दिली आहे.ही साळुंखे-पाटील कुटुंबीयांची दानत आहे.सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांचा विकास करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आज शासकीय इमारतीचे उदघाटन होत असताना,मला मनस्वी आनंद होत आहे.कारण आपल्याच गावातील वयोवृद्ध नागरिक,महिला व मुलींच्या शाळेची कामे ही आता एकाच ठिकाणी होणार आहेत.कुठल्याही कागदासाठी आता सांगोलला जाण्याची गरज नाही.ही व्यवस्था होत असताना कार्यतपस्वी आमदार कै.काकासाहेबांचे स्वप्न साकार करण्याचे काम आमच्या हातून घडत आहे,यातच मोठे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी म्हणाले की,सायंकाळी मोबाईल आणि टीव्ही बंद करुन जवळा गावाने सोलापूर जिल्ह्यात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याचा आदर्श इतर गावांनी व तालुक्यांनीही घ्यावा,असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यासह जवळा गावात एकाच छताखाली सर्व विभाग कार्यरत होणार असल्याने शासकीय योजना राबवताना सोईस्कर होणार आहे. यामध्ये प्रत्येक योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सज्जन मागाडे यांनी केले.
                    ==========================

नागरिकांच्या अडीअडचणी दूर होतील :

अथक प्रयत्नांतर सर्व विभागीय शासकीय कार्यालये ही एकाच छताखाली सुरु होणार आहेत. हे शासकीय कार्यालय आपल्या श्री नारायणदेव मंदिराच्या पावन नगरीत सुरु होत असून हे आपले भाग्य आहे.आता बहुतांशी शासकीय कामे आपल्याच गावात पूर्ण होणार असून,सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय कामकाजाला गती मिळणार आहे.त्यामुळे, नागरिकांच्या अडीअडचणी निश्चितपणाने दूर होतील,असा विश्वास आहे.
– ॲड.यशराजे दीपकआबा साळुंखे-पाटील
==========================