सांगोला नगरपालिकेकडून मिरज रोड बायपास ते वंदे मातरम चौक बायपास मार्गावर डेकोरेटिव्ह लाईट उभारणी

        शहाजीबापू पाटील यांच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर

सांगोला :

सांगोला शहराच्या पश्चिम भागात सुशोभीकरणासह नागरी सुविधांमध्ये भर घालण्याच्या उद्देशाने सांगोला नगरपालिके मार्फत मिरज रोड बायपास ते वंदे मातरम चौक बायपास या महत्त्वाच्या मार्गावर उच्च दर्जाच्या डेकोरेटिव्ह लाईट बसविण्याच्या कामासाठी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या माध्यमातून 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असून शहर विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या प्रकल्पांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित,आकर्षक आणि उच्च गुणवत्तेच्या डेकोरेटिव्ह लाईटची उभारणी करण्यात येणार आहे.या प्रकाश व्यवस्थेमुळे शहराच्या मुख्य पश्चिम भागाचे,माळवाडी मार्गाचे सौंदर्य वाढण्यासोबतच नागरिकांना रात्रीच्या वेळी अधिक सुरक्षित,प्रकाशमान आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

मिरज रोड बायपास ते वंदे मातरम चौक बायपास या मार्गावरील डेकोरेटिव्ह लाईट प्रकल्प हा लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदभाऊ माने यांच्या दूरदृष्टीतून आणि विकासाभिमुख नियोजनातून मार्गी लागलेले महत्त्वाचे काम मानले जात आहे.शहराच्या पश्चिम बाजूस असलेल्या माळवाडी भागाच्या विकासाला प्राधान्य देत या भागात आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात,या उद्देशाने त्यांनी सातत्याने नियोजन केले आहे.

विशेषतः सांगोला शहराच्या पश्चिम बाजूस असलेल्या माळवाडी भागाच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.या भागात मूलभूत नागरी सुविधा,रस्ते आणि परिसर विकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून सदर लाईट प्रकल्पामुळे या परिसराच्या विकासाला नवे स्वरुप मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

या कामासाठी माजी आमदार शहाजीबापू पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंद माने यांच्याकडे नगरसेवक चैतन्य राऊत तसेच नगरसेविका सीमा सरगर यांनी सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नातून हा विकास प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे.या उपक्रमामुळे शहराचे सौंदर्य वाढण्याबरोबरच पश्चिम भागातील नागरी विकासाला गती मिळेल आणि सांगोल्याच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भर पडेल,अशी अपेक्षा नगरसेवक चैतन्य राऊत व नगरसेविका सीमाताई सरगर यांनी व्यक्त केली आहे.
===================================