सांगोला नगरपरिषदे मार्फत आयोजित ‘स्वातंत्र्योत्सवी रांगोळी‘ स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न
सांगोला : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात विविध प्रकारचे उपक्रम साजरे करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” याअंतर्गत जनजागृतीसाठी सांगोला नगरपरिषदेमार्फत शहरातील बचत गटांसाठी आयोजित “स्वातंत्र्योत्सवी रांगोळी” स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नगरपरिषद सभागृहात पार पडल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आजवर आपल्या देशाची विविध क्षेत्रात झालेली प्रगती जनतेस कळावी आणि त्यातून प्रेरणा घेवून पुढील काळात सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून स्वतःची आणि पर्यायाने देशाची प्रगती साध्य करण्यासाठी नागरिकांना प्रेरणा मिळावी,या हेतूने मुख्याधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली व कार्यालयीन अधीक्षक श्रीमती अभिलाषा निंबाळकर यांचे संकल्पनेतून आणि प्रयत्नातून पार पडलेल्या या “स्वातंत्र्योत्सवी रांगोळी स्पर्धेत” शहरातील बचत गटातील एकूण पंधरा महिलांनी सहभाग नोंदविला होता. एकूण दीड तासाच्या वेळामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, स्वातंत्र्योत्तर भारत, स्वतंत्र भारतासमोरील समस्या, भारताची वैज्ञानिक व आर्थिक प्रगती, आणि विविध प्रकारचे देशभक्तीपर संदेश देणाऱ्या रांगोळ्यांचे रेखाटन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे बक्षीस वितरण मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर, लेखापाल विजयकुमार कन्हेरे, स्वप्निल हाके, योगेश गंगाधरे, विनोद सर्वगोड या नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र, गुलाबपुष्प, रोख रक्कम आणि रोप देण्यात आले.जागतिक ओझोन दिनाचे औचित्य साधून आयोजित या बक्षीस वितरण कार्यक्रमात सर्व सहभागींना एक रोप देण्यात येऊन पर्यावरण रक्षणासाठी ‘वृक्षारोपणाची गरज‘ हा एक चांगला संदेशही देण्यात आला.
————————————————
अमृत महोत्सवाबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या जनजागृतीसाठी शहरातील बचत गटातील महिलांसाठी “स्वातंत्र्योत्सवी रांगोळी स्पर्धेचे” आयोजन करून अमृत महोत्सवाबद्दल जनजागृती तसेच बचत गटातील महिलांच्या कलागुणांना वाव देणे या दोन्ही गोष्टी साधता आल्या. त्याचप्रमाणे जागतिक ओझोन दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सर्व सहभागीना झाडाचे छोटे रोप देऊन वृक्षतोडीमुळे होणारा ओझोनचा ऱ्हास आणि पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देण्याचाही प्रयत्न केला.
कैलास केंद्रे – मुख्याधिकारी, नगरपरिषद
————————————————
“स्वातंत्र्योत्सवी रांगोळी” स्पर्धेच्या विजेत्या :
प्रथम क्रमांक : निकिता पाटील
द्वितीय क्रमांक : स्नेहल मडके
तृतीय क्रमांक : करुणा जांगळे
उत्तेजनार्थ १ : वैजयंती दौंडे
उत्तेजनार्थ २ : विद्या पाटणे
————————————————