लंपीच्या प्रादुर्भावामुळे पशुधन धोक्यात
सोलापूर :
जनांवरावरील लंपीसदृश्य आजार दिवसेंदिवस फैलावतच चालल्याने महाराष्ट्र राज्यातीलच नव्हेतर,संपूर्ण देशभरातील पशुधन सध्या धोक्यात आले असून जनांवरावरील या आजारामुळे हळुहळू दूध उत्पादनही घटू लागले आहे आणि त्याचा दूधविक्रीवरही परिणाम जाणवू लागल्याने शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाला आहे.
सध्या शेती व्यवसाय हा अनियमीत पावसामुळे व नैसर्गीक आपत्तीमुळे बिनभरवशाचा झाला असल्याने शेतीला पूरक व्यवसाय आणि जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळाले आहेत. दूधातूनही चांगले उत्पन्न मिळू लागल्याने भरपूर दूध देणार्या महागड्या पण, चांगल्या जातीच्या गाई-म्हशींचा गोठा आता अनेक शेतकर्यांच्या दारापुढे दिसून येतो. दुग्ध व्यवसायामुळे चांगली प्रगती होत असताना मधूनच जनावरांवरील हा लंपीचा आजार आला आणि सर्वत्र कोरोनासारखा झपाट्याने वाढू लागल्याने जनावरे चारा-पाणी वर्ज्य करु लागली त्यामुळे पर्यायाने दूध उत्पादनही कमी होवू लागले आणि त्याचाच परिणाम दूधविक्रीवरही जाणवू लागला आहे.
त्यामुळे शेतकरीवर्गही धास्तावला असून अशा परिस्थितीत शेतकर्याने खचून न जाता आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घेवून निगा राखावी,वरचेवर गोठा स्वच्छ ठेवून जनावरांचे लसीकरण करुन घ्यावे. शासनानेही आपल्या पशुवैद्यकीय विभागामार्फत शेतकर्यांचे पशुधन कसे वाचेल ? यासंदर्भात योग्य ती खबरदारी घेवून शेतकर्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी योग्य ती पावले तातडीने उचलल्यास शेतकर्यांना दिलासा मिळेल.