सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने शनिवारी शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन
प्रा.नितीन बानुगडे-पाटील, शरणभैय्या पाटील यांचेसह विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण

सांगोला :
सूर्योदय उद्योग समूह व एलकेपी मल्टीस्टेट परिवारातील सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह सांगोला येथे शनिवारी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता ‘शिक्षक दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सूर्योदय ग्रुपचे संस्थापक व फाउंडेशनचे अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अत्यंत प्रेरणादायी अशा शंभुराजे महानाट्याचे लेखक,इतिहास अभ्यासक आणि आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रबोधन करणारे वक्ते महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ प्रा.नितीन बानगुडे-पाटील यांच्या व्याख्यानाची मेजवानी सर्वांसाठी असणार आहे.त्याचबरोबर, मराठवाड्यात विशेषतः लातूर जिल्ह्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रामध्ये उत्तुंग कार्य असलेले युवा उद्योजक शरणभैया पाटील तसेच सूर्योदय परिवाराचे संस्थापक व सूर्योदय ग्रुपचे आधारवड अनिलभाऊ इंगवले,सूर्योदय दूध विभागाचे चेअरमन डॉ.बंडोपंत लवटे, सूर्योदय मॉल व वस्त्रनिकेतनचे सुभाष दिघे गुरुजी इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते या सर्व पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती सूर्योदय फाउंडेशनचे सचिव जगन्नाथ भगत गुरुजी यांनी दिली.
सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती,सहकाराचा सखोल अभ्यास तसेच उद्योग आणि व्यवसाय याबरोबरच सुरुवातीपासूनच सामाजिक चळवळीचा पिंड असलेले धुरंधर व्यक्तिमत्व म्हणजे, अनिलभाऊ इंगवले यांनी जगन्नाथ भगत, डॉ.बंडोपंत लवटे व सुभाष दिघे यांना सोबत घेऊन सन 2010 साली सूर्योदय नावाचे छोटेसे रोपटे सांगोला तालुक्यातील मेडशिंगी या ठिकाणी उभे केले.गेल्या सुमारे सोळा वर्षांपासून सूर्योदयच्या माध्यमातून या तरुणांनी विविध क्षेत्रांमध्ये चौफेर प्रगती केलेली आहे.वित्तीय संस्था आणि उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून हजारो तरुणांच्या हाताला काम देत असताना दुसरीकडे सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम देखील मोठ्या प्रमाणावर केलेले आहे. सुरुवातीला मेडशिंगी फेस्टिवलच्या माध्यमातून राज्यातील अनेक समाजसेवक,लोकसेवक, वक्ते,हास्यसम्राट तसेच कीर्तनकार व कलाकारांना आणून हजारो ग्रामस्थांच्या साक्षीने समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले.पाणी फाउंडेशन,नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण,गुणवंतांचा सन्मान,विविध प्रकारची आरोग्य शिबिरे,व्यापक स्वरूपातील रक्तदान शिबिरे, दुष्काळातील सेवा कार्याला मदत,कोरोना कालावधीत हजारो गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप,ग्रामीण भागातील महिलांना तीर्थयात्रा दर्शन अशा अनेक प्रकारे समाजाचे ऋण व्यक्त करत,या उद्योग समूहाने आपली सामाजिक बांधिलकी मोठ्या प्रमाणावर जोपासलेली आहे.
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने अनेक शाळांवरती तसेच सार्वजनिक ठिकाणी सुमारे अडीच हजार वृक्षांची लागवड करुन त्यांची उत्तम प्रकारे जोपासना देखील सुरु ठेवलेली आहे. गतवर्षी स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने सूर्योदय ग्रुपच्या वतीने एकाच वेळी महाराष्ट्र व कर्नाटकातील मिळून तीनशे शाळांवर सुमारे अठराशे विद्यार्थी आणि तब्बल साडेआठ हजार शिक्षकांना सन्मानित करुन एक अनोखा विक्रम प्रस्थापित केलेला आहे.
विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून स्वतःला झोकून देत उत्कृष्ट काम करणारे काही गुणवंत शिक्षक आणि समाजासमोर दीपस्तंभ बनून आदर्श उभा करणाऱ्या काही उल्लेखनीय शाळा यांना या शिक्षकदिन कार्यक्रमात पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
काही कर्तृत्वसंपन्न मान्यवरांची मनोगते, प्रेरणादायी वक्ते प्रा.नितीन बानुगडे-पाटील यांचे सुश्राव्य व्याख्यान,पुरस्कार वितरण व स्नेहभोजन असे आजच्या कार्यक्रमाचे स्वरुप असून या ‘शिक्षक दिन’ कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन सूर्योदय अर्बनचे चेअरमन डॉ.बंडोपंत लवटे व एलकेपी मल्टीस्टेटचे व्हॉइस चेअरमन सुभाष दिघे गुरुजी यांनी केले आहे.
=========================



