महत्वाच्या बातम्या

‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ अंतर्गत प्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी पक्षकारांनी पुढाकार घ्यावा – तहसीलदार बाळूबाई भागवत

सांगोला :

महसूल प्रशासनातील प्रलंबित महसुली प्रकरणे जलद गतीने व आपापसातील सहमतीने निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे.या अभियानाला १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीसाठी शासनाने मान्यता दिली असून या अभियानाचा लाभ घेऊन सांगोला तालुक्यातील संबंधित पक्षकारांनी आपली प्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन तहसीलदार बाळूबाई भागवत यांनी याद्वारे केले आहे.

महसूल प्रशासनातील अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनीशी संबंधित महसुली दावे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असतात.ही प्रकरणे वर्षानुवर्षे चालत असल्याने संबंधित पक्षकारांचा वेळ व पैसा खर्च होतो. ही बाब लक्षात घेऊन प्रलंबित प्रकरणे परस्पर सहमतीने जलद गतीने निकाली काढण्याकरिता
क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून हे अभियान सुरु करण्यात आले आहे.सोलापूर जिल्ह्यासाठी ऑक्टोबर,नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून दसरा व दिवाळी सणांच्या सुट्ट्यांचा कालावधी वगळून पक्षकारांना सुनावणीसाठी उपस्थित राहणे सोयीचे व्हावे,या दृष्टीने नियोजन करण्यात आले असल्याचे तहसीलदार बाळूबाई भागवत यांनी यावेळी सांगितले.

तरी,सांगोला तालुक्यातील संबंधित पक्षकारांनी त्यांच्या अर्धन्यायिक स्वरुपाच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये शासन निर्णयात नमूद केलेल्या तरतुदींनुसार तडजोडनामा तयार करुन तो संबंधित मंडळ अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालय,सांगोला येथे ३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२६ या कालावधीत
सादर करावा आणि या अभियानाचा लाभ घेऊन संबंधित पक्षकारांनी आपली प्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तहसीलदार बाळूबाई भागवत यांनी केले
आहे.
===========================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button