सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित मेडशिंगीत साकारले एकपात्री हृदयस्पर्शी नाटक
सावित्रीबाईंचा त्याकाळचा संघर्ष पाहून महिलांच्या ओलावल्या डोळ्यांच्या कडा

सांगोला :
सावित्रीबाई फुले यांना स्त्री शिक्षणासाठी सुमारे 200 वर्षांपूर्वी जो संघर्ष करावा लागला,तो संघर्ष संध्या पानसकर या सिने अभिनेत्रीने आपल्या दमदार अभिनयाद्वारे एकपात्री नाटकात इतक्या प्रभावीपणे सादर केला की, मुलींना शिक्षण देण्यासाठी सावित्रीबाईंचा त्याकाळचा संघर्ष पाहून सांगोला तालुक्यातील मेडशिंगी येथे
उपस्थित सर्वच महिलांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्याशिवाय राहिल्या नाहीत.

सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित “संघर्ष यात्री सावित्रीबाई” या नाटकाचा एकपात्री प्रयोग हा मुंबई, नागपूर,औरंगाबाद,पुणे अशा मोठ्या शहरांसह राज्याच्या ग्रामीण भागातील प्रेक्षकांच्याही कौतुकास पात्र ठरला असून हे हृदयस्पर्शी नाटक आपल्या भागातील बहुजन समाजातील महिलांनाही पाहण्याचे भाग्य मिळावे आणि जनजागृती व्हावी,या सामाजिक बांधिलकेच्या जाणीवेतून मुंबई येथील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त तथा मेडशिंगी भूषण सिद्धार्थ कृष्णराव कसबे यांनी “संघर्ष यात्री सावित्रीबाई” या नाटकाचा एकपात्री प्रयोग सांगोला तालुक्यातील मेडशिंगी येथे नुकताच आयोजित केला होता.मेडशिंगीत एका दिवसात दोन प्रयोग झाले.एक भर दुपारी देशभक्त संभाजीराव शेंडे विद्यालयाच्या प्रांगणात तर,दुसरा प्रयोग अंबिकादेवी मंदीरासमोर देवी भक्तांच्या उपस्थितीत पार पडला.
स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळी सोसलेले अपार कष्ट आणि केलेला सर्वस्वाचा त्याग याची हृदयस्पर्शी व तेवढीच प्रेरणादायी कहाणी “संघर्ष यात्री सावित्री” या एकपात्री प्रयोगामध्ये सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री संध्या पानसकरने आपल्या अभिनयाद्वारे इतक्या प्रभावीपणे सादर केली की, स्त्री शिक्षणासाठी संघर्ष करणारी सावित्रीबाई फुले जणू साक्षात आपल्यासमोर
उभी असल्याचा भास उपस्थित प्रेक्षकांना झाल्याने भावुक होऊन त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.
या नाटकातील भावस्पर्शी संवाद ऐकून मेडशिंगीच्या श्री अंबिका देवी प्रभावती माता मंदीरात देवीची ओटी भरण्यासाठी नारळ व इतर पूजेचे साहित्य घेऊन आलेली एक बाई तर,अश्रू सावरत संध्या पानसकरला म्हणाली “आज देवीसाठी आणलेली ओटी तुम्हाला अर्पण करायची आहे सावित्रीबाई’ हे शब्द ऐकून उपस्थित सर्व प्रेक्षक अक्षरशः निशब्द झाले होते.
खरंतर हे नाट्य नाही सत्य आहे,जे चाकोरीबद्ध नाट्यतंत्राचे परिमाण झुगारुन थेट प्रेक्षकांच्या हृदयात प्रवेश करत त्यांच्या संवेदनेशी एकरुप झाले होते.
=========================
प्रयोगाच्या यशस्वीतेसाठी झटणारे मान्यवर :
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाताई शिंगाडे,फॅबटेक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा भाऊसाहेब रुपनर,सूर्योदय उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अनिलभाऊ इंगवले,देशभक्त संभाजीराव शेंडे विद्यालयाचे प्रमुख अरुणभाऊ शेंडे,अनिल शेंडे,प्रा.देविदास कसबे, बाळासाहेब कसबे,प्रभाकर कसबे,भारत कसबे,विनोद कसबे,अतुल कसबे,डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष मागाडे, पद्मिनीताई कांबळे,डॉ.विनोद थोरात,इतर सामाजिक कार्यकर्ते,पतसंस्थेचे पदाधिकारी व सदस्य,विवीध बचत गटाचे पदाधिकारी व सदस्य तसेच मेडशिंगी पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ.
==============



