डॉ.अनिकेत देशमुख यांचा वाढदिवस विविध उपक्रमांद्वारे ‘प्रेरणा दिन’ म्हणून होणार साजरा

सांगोला :
सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व युवा नेते डॉ.अनिकेत (भैय्या) देशमुख यांचा वाढदिवस यावर्षी ‘प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असून,त्यानिमित्त डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थी,युवक व समाजाच्या विकासाला चालना देणाऱ्या विविध शैक्षणिक,रोजगार,कौशल्यविकास,क्रीडा व संशोधनाधारित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
‘प्रेरणा दिना’ निमित्त रविवारी 27 सप्टेंबर रोजी सांगोला तालुका मर्यादित बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.तसेच तालुक्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने,29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत रोजगार मेळावा व कॅम्पस ड्राइव्ह हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून,यामध्ये विविध 10 नामांकित कंपन्या व बँका सहभागी होणार आहेत.
त्याचबरोबर,युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्राप्त व्हावे,या उद्देशाने दि.3 ऑक्टोबर रोजी 40 दिवसीय सहाय्यक इलेक्ट्रिशियन प्रशिक्षण कोर्सचे उदघाटन करण्यात येणार आहे आणि 5 ऑक्टोबर रोजी ‘मशरुम शेती व व्यवस्थापन’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रोजच्या आहारातील आळंबी (मशरुम) सेवनाचे शास्त्रीय व वैद्यकीय महत्त्व या विषयावर 6 व 7 ऑक्टोबर रोजी द्विदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर,‘प्रेरणा दिना’चे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वर्गीय डॉ.गणपतरावजी देशमुख मेरिट स्कॉलरशिप प्रदान करण्यात येणार आहे.तसेच न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांचे वतीने रंगभरण,निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
डॉ.अनिकेत देशमुख यांच्या वाढदिवसाला केवळ उत्सवाचे स्वरुप न देता विद्यार्थ्यांना शिक्षण, युवकांना कौशल्य व रोजगार,गुणवंतांना प्रोत्साहन आणि समाजाला विकासाची दिशा देणारा ‘प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न आहे. या विविध उपक्रमांमध्ये तालुक्यातील विद्यार्थी, युवक-युवती व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर धसाडे तसेच उपमहाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.केशव माने यांनी केले आहे.
=========================
3 ऑक्टोबर रोजी पारितोषिक व गौरव समारंभ :
या सर्व उपक्रमांचा पारितोषिक व गौरव समारंभ शनिवारी 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. संस्थेचे सचिव विठ्ठलराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास कमलापूर येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे (बी.एड.) प्राचार्य डॉ.सर्जेराव (साजिकराव) पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून सत्कारमूर्ती डॉ. अनिकेतभैय्या देशमुख यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे.



