सांगोला :
माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांचे विशेष लक्ष असलेल्या व राज्यातील अग्रगण्य विकास सेवा सोसायटी म्हणून लौकिक असलेल्या जवळा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेस राज्याचे सहकार मंत्री नाम.बाबासाहेब पाटील हे शनिवारी १९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता सदिच्छा भेट देणार असून यावेळी संस्थेचे मार्गदर्शक माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती जवळा सोसायटीचे चेअरमन सुनील आबा साळुंखे यांनी दिली.

माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली जवळा येथील विविध कार्यकारी संस्था ही राज्यातील अत्यंत नामांकित सहकारी संस्था म्हणून ओळखली जाते.या संस्थेवर १९४६ पासून सलग ८० वर्षे पूर्वी स्व.आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील व नंतर माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या गटाचे वर्चस्व राहिले आहे.स्थापनेपासूनच सातत्याने ही संस्था अ वर्गात आहे.या विकास सेवा सोसायटीची उलाढाल कोट्यावधी रुपयांची असून गेल्या २५ वर्षाहून अधिक काळ 100 टक्के कर्ज वसुली हे या संस्थेचे खास वैशिष्ट्य आहे.या सहकारी संस्थेची स्वतःची दोन मजली सुसज्ज इमारत आहे.तसेच ३ स्वस्त धान्य दुकाने आहेत. तसेच ही संस्था सभासद शेतकऱ्यांना अत्यंत अल्प दरात सोनेतरण कर्ज उपलब्ध करुन देते.विशेष म्हणजे सोने तारण कर्जाची सेवा सभासदांना २४ तास उपलब्ध असते. ही सेवा महाराष्ट्रात एकमेव जवळा सोसायटीच्या सभासदांनाच मिळते हे विशेष.सभासद शेतकऱ्यांना बचतीची सवय लागावी म्हणून या सोसायटीच्या वतीने पिग्मीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
राज्यभर नावलौकिक असणाऱ्या जवळा विकास सेवा सोसायटीला प्रत्यक्ष भेट देऊन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे या सोसायटीच्या कामाची पाहणी करणार आहेत.यावेळी संस्थेचे सर्व सभासद शेतकरी तसेच संचालक मंडळ या सर्वांनी उपस्थित रहावे,असे आवाहन जवळा विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुनील आबा साळुंखे यांनी केले आहे.
===================================
More Stories
गणेशोत्सवातील महाप्रसादासाठी FDA नोंदणी बंधनकारक – डॉ.मंगेश लवटे
घरपट्टीत कसलीही दरवाढ नाही,ही तर वाढीव बांधकामामुळे करवाढ – नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने
दुष्काळी सांगोला तालुक्याला पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित सोडावे – माजी आमदार दीपकआबा