मोबाईलचा अनावश्यक वापर टाळून त्याचा उपयोग ज्ञान व कौशल्य विकासासाठी करावा – प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड

शिवाजी पॉलिटेक्निकमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा

सांगोला :

            आपण उद्याचे अभियंते आहोत.आपल्या ज्ञानाचा, कौशल्याचा व कल्पकतेचा उपयोग देशाच्या उन्नतीसाठी केला पाहिजे.विद्यार्थ्यांनी आपल्या कामाप्रती निष्ठा आणि प्रामाणिकपणा ठेवून जबाबदारीने काम करावे.कोणतेही काम करताना त्यामध्ये नाविन्यपूर्ण विचार करण्याची वृत्ती जोपासावी.नेहमी नवनिर्मितीच्या विचाराने प्रेरित होऊन प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासेने आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पहावे.तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचा आदर करावा,दररोज व्यायाम करावा,पौष्टिक आहार घ्यावा आणि वेळेचा योग्य सदुपयोग करावा.मोबाईलचा अनावश्यक वापर टाळून त्याचा उपयोग ज्ञान आणि कौशल्य विकासासाठी करावा,असा मौलिक सल्ला विद्या विकास प्रतिष्ठान इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग,सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर तथा प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड सर यांनी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अभियंता दिनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दिला.

सांगोल्यातील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये विद्या विकास प्रतिष्ठान इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग,सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर व प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड सर तसेच विद्या विकास प्रतिष्ठान ज्युनिअर कॉलेज,सोलापूरचे प्राचार्य संतोष माने सर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियंता दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी,प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना त्यांनी वरीलप्रमाणे आपले विचार व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष इंजि. महादेव गायकवाड हे होते तर,संस्थेचे सचिव अंकुशराव गायकवाड व कॉलेजचे प्राचार्य डॉ.रणजीत देशमुख हे ही प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन,माता सरस्वती व सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.याप्रसंगी, संस्थेचे उपाध्यक्ष इंजि.महादेव गायकवाड यांच्या हस्ते डॉ.अरुण गायकवाड यांचा तर,संस्थेचे सचिव अंकुशराव गायकवाड यांच्या हस्ते संतोष माने सर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी विद्या विकास प्रतिष्ठान ज्युनिअर कॉलेज,सोलापूरचे प्राचार्य संतोष माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,अभियांत्रिकी क्षेत्र हे केवळ पदवी किंवा नोकरी मिळविण्यापुरते मर्यादित नसून नवनिर्मिती, संशोधन आणि समाजाच्या समस्या सोडविण्याचे प्रभावी माध्यम आहे.अभियंता हा देशाच्या विकासाचा महत्त्वाचा घटक असून,आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग समाजाच्या व देशाच्या प्रगतीसाठी करण्याची जबाबदारी प्रत्येक अभियंत्याची आहे.विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत,प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वासाने प्रयत्न करावेत,असे सांगितले.

यासमयी,संस्थेचे उपाध्यक्ष इंजि.महादेव गायकवाड यांनी महान अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरवपूर्ण उल्लेख करुन त्यांच्या जीवन कार्याची विद्यार्थ्यांना माहिती दिली.इंजि.महादेव गायकवाड पुढे म्हणाले की,आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असलो तरी,ते काम प्रामाणिकपणे आणि पूर्ण निष्ठेने केले पाहिजे.आपल्या कामामध्ये सातत्य असेल आणि प्रयत्न करण्याची तयारी असेल तर,यश निश्चितपणे मिळते. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करुन अडचणींना न घाबरता सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत,असे सांगून पुढे ते म्हणाले की,आपल्या कौशल्याचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसोबतच समाज आणि देशाच्या विकासासाठी कसा करता येईल ? याचा विचार प्रत्येक विद्यार्थ्याने केला पाहिजे.ज्ञानासोबत संस्कार, कौशल्यासोबत शिस्त व यशासोबत सामाजिक बांधिलकी जपली तरच,विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांगीणपणे विकसित होईल,असे प्रतिपादन इंजि.महादेव गायकवाड यांनी केले.

संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड व विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.संदीप बावचे यांनी केले.यावेळी सर्व विभागप्रमुख,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                      =========================

विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता,सर्जनशील विचार व समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करावी :

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात भरीव योगदान दिले असून म्हैसूर राज्याचे दिवाण म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.त्यांच्या कार्याची दखल घेत इंग्रज सरकारकडून त्यांना “सर” ही पदवी तर,भारत सरकारकडून “भारतरत्न” हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला होता. अभियांत्रिकी क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अंगी जिज्ञासा,कुतूहल व नवनवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता असणे अत्यंत आवश्यक आहे.अभियांत्रिकी शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता त्याचा प्रत्यक्ष जीवनातील समस्यांशी संबंध जोडला पाहिजे.तंत्रज्ञानामध्ये सातत्याने बदल होत असल्याने विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास,प्रयोगशीलता,सर्जनशील विचार आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करावी.
                    – प्राचार्य डॉ.रणजीत देशमुख
=========================