क्राईम

चोरीच्या २६ दुचाकींसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात सांगोला पोलीसांना यश

 

सांगोला :

                        सांगोला शहर व तालुक्यातील दुचाकी (मोटारसायकल) चोरीचे प्रमाण अलिकडे खूपच वाढले असून बाजार व वर्दळीचे ठिकाण पाहून हे दुचाकीचोर सहजरित्या दुचाकी चोरी करुन नेत होते. सांगोला पोलीसही या दुचाकीचोरांच्या मागावर असताना, तपासादरम्यान, पोलीसांनी ५ दुचाकीचोरांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरीच्या २६ दुचाकींसह सुमारे ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात सांगोला पोलीसांना यश मिळाल्याने सांगोला तालुक्यातील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सांगोला पोलीस स्टेशनच्या हददीत घडलेल्या मोटरसायकल (दुचाकी) चोरीच्या गुन्हयांचा तपास करीत असताना, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या गोपनीय व खात्रीशीर माहिती वरुन मंगळवेढा विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि.नागेश यमगर तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पो.ना. मेटकरी, पो.ना.जलवडे व पो.कॉ.सावजी यांनी संशयित आरोपी महंमद हुसेन साहेब शेख (रा.रेवणे गल्ली,तांदुळ मार्केट, मिरज,जि.सांगली) व संतोष सिध्दू शिंगे (रा.मिरज, जि.सांगली) यांना मिरज येथून ताब्यात घेवून व सदर गुन्हयात अटक करुन अधिक तपास केला असता,सदर आरोपीने मिरज, कागवाड व इतर जिल्हयातून, वेगवेगळ्या ठिकाणाहून १५ मोटार सायकली चोरल्याची कबुली देवून त्या मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथे विक्री केल्याचे सांगीतल्याने त्यानुसार, त्या १५ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या असून सदर शोध पथकाकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हा अंदाजे ८ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा आहे.

तसेच स.पो.नि.प्रशांत हुले आणि गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पो.हे.कॉ.वजाळे,पो.ना.मोहोळकर, पो.ना.पाटील,चा.पो.कॉ.काशीद यांनी संशयित आरोपी नामे सोपान वैजिनाथ वगरे (रा.गुंफावाडी, जि.लातूर),पप्पु उर्फ ज्ञानेश्वर रावसाहेब बुरंगे (रा.जवळा,ता. सांगोला) व अमोल बिरा वगरे (रा.बुरंगेवाडी,ता.सांगोला) यांना सदर गुन्हयात अटक करुन अधिक तपास केला असता,या आरोपींनी सोलापूर व इतर जिल्ह्यातून वेगवेगळया ठिकाणाहून १५ मोटार सायकली चोरल्याची कबुली देवून त्या सांगोला तालुक्यातील जवळा,बुरंगेवाडी व तरंगेवाडी येथे विक्री केल्याचे सांगीतल्याने त्यानुसार ११ दुचाकी (मोटार सायकली) हस्तगत करण्यात आल्या असून सदर जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हा अंदाजे २ लाख ८० हजार रुपये किंमतीचा आहे. अशारितीने, वरील दोन्ही पथकांनी अटक केलेल्या आरोपींकडून एकूण २६ मोटरसायकली जप्त करुन सुमारे ११ लाख,१५ हजार रुपये किंमतीचा चोरीस गेलेला मुददेमाल जप्त करण्यात सांगोला पोलीसांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

सदर गुन्हयाचा तपास सोलापूर ग्रामिणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, मंगळवेढा विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील मॅडम,सांगोल्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर व स.पो.नि.प्रशांत हुले, पो.हे.कॉ. दत्ता वजाळे,पो.ना.अभिजीत मोहोळकर,पो.ना.बाबासाहेब पाटील,पो.ना.मेटकरी,पो.काॅ.नलवडे,पो.कॉ. सावजी,पो.काॅ. संभाजी काशीद व सायबर पोलीस स्टेशन कडील पो.ना. युसुफ पठाण यांची गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मोठी मदत मिळाली.
—————————————————————————

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button