दागिने व मोटार सायकल चोरी करणार्या सराईत गुन्हेगारास पकडण्यात सांगोला पोलीसांना यश

सांगोला :
सांगोला शहर व ग्रामीण भागातील महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून महिला वर्गात दहशत निर्माण करणार्या आणि मोटार सायकल चोरी करुन वाहनधारकांना घाबरवून सोडणार्या सराईत गुन्हेगारास पकडण्यात पोलीस निरीक्षक भिमराय खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीसांना नुकतेच यश मिळाले असून त्यांनी बजावलेल्या या कामगिरीमुळे महिला वर्गांसह वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील चोरीच्या घटनांना आळा घालून गुन्हे उघडकीस आणणेकरीता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगोला पोलीसांना दिलेल्या निर्देशानुसार सांगोल्याचे पोलीस निरीक्षक भिमराय खणदाळे यांनी सांगोला पोलीस ठाणेकडील तपास पथक नेमून या पथकातील पोलीस कर्मचार्यांना असे गुन्हे उघडकीस आणणेसाठी सक्त सूचना दिल्या होत्या.सांगोला तालुक्यातील कडलास येथील सुनिल शामराव गायकवाड यांची मोटार सायकल सांगोला शहर हद्दीतील मिरज रोडवरील माऊली हॉटेल येथून चोरी झालेबाबत अज्ञात आरोपी विरुध्द सांगोला पोलीस ठाणेकडील गु.र.नं. १९१/२०२५ व बी.एन.एस.कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल होता.
त्या अनुशंगाने सांगोला पोलीस ठाणेकडील तपास पथकाकडून चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत तपास केला जात असताना तांत्रिक विश्लेषणाचे आधारे चोरी करणारा इसम सुनिल मारुती मंडले (वय २६, रा.पिंपरी खुर्द,ता.आटपाडी,सध्या रा.देवापूर, ता.माण,जि.सातारा) यास ताब्यात घेवून त्याचेकडे विचारपूस केली असता,त्याने वरील मोटार सायकल चोरी केलेबाबत कबुली दिल्यानंतर ती मोटार सायकल जप्त करुन गु.र.नं.१९१/२०२५ या गुन्हयात आरोपी सुनिल मंडले यास अटक केली.
तसेच पोलीस चौकशी दरम्यान,सांगोला पोलीस ठाणेकडील गु.र.नं. १२४/२०२५ बी.एन.एस. कलम ३०४ (२) मधील फिर्यादी सुनंदा लक्ष्मण गोडसे (रा.लक्ष्मीनगर,ता.सांगोला) हिस सदर आरोपीने त्याचेजवळील चारचाकी गाडीत बसवून तिला लक्ष्मीनगर येथे सोडतो,असे म्हणून लक्ष्मीनगर रोडवरील नर्सरीजवळ गाडी थांबवून तिचे गळयातील ८ ग्रॅम सोन्याचे गंठण व ७ ग्रॅम सोन्याचे बोरमाळ असा ऐवज आरोपी सुनिल मंडले व त्याची साथीदार शुभांगी रामचंद्र बुधावले (वय-२६,रा.निंबवडे,ता.आटपाडी) या दोघांनी हिसका मारुन ते चोरी केलेबाबत कबुल करुन सदरचे सोन्याचे दागिनेही या आरोपीने काढून दिले.
त्याचप्रमाणे,सांगोला शहरातील विनय कल्याण कांबळे (रा.वासूद रोड,नरेंद्र नगर) यांचे बंद घराचे कुलूप कोयंडा तोडून त्यांचे घरातील रोख रक्कम तसेच ३ ग्रॅमचे सोन्याचे कानातील दोन टॉप्स जोड,७ ग्रॅम वजनाचा लहान मुलाचा कंबरेचा करदोडा (चैन) हे देखील आरोपी सुनिल मंडले याने चोरी केलेबाबत कबुली देवून सोन्याचे दागिने काढून दिले आहेत. सदरचे सोन्याचे दागिने व मोटार सायकल असा सुमारे २ लाख ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपी सुनिल मारुती मंडले (वय-२६,रा.पिंपरी खुर्द,ता. आटपाडी,सध्या रा.देवापूर,ता.माण, जि.सातारा) व शुभांगी रामचंद्र बुधावले (वय २६,रा.निंबवडे,ता. आटपाडी) यांचेकडून जप्त करण्यात आलेला आहे.——————————————————————————
सदरची कामगिरी पार पाडण्यासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक प्रितमकुमार यावलकर,मंगळवेढा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, सांगोल्याचे पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. बाबासाहेब पाटील,पो.कॉ. लक्ष्मण वाघमोडे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पो.हे.कॉ. युसूफ पठाण यांनी मदत केली आहे.