पत्रकार दिपक धोकटे यांना मारहाण करणार्या पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल
सांगोला :
मुलीला पळवून नेण्यास मदत केल्याचा रोष मनात धरुन चिडून जावून मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांनी मिळून दैनिकाचे प्रतिनिधी म्हणून काम करत असलेले महूद येथील दिपक धोकटे यांना मारहाण करणार्या पांच जणांविरुध्द गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात,दीपक चंद्रकांत धोकटे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी बापू येडगे,हरिश्चंद्र येडगे,प्रकाश कोळेकर सह इतर २ अनोळखी इसमांविरुध्द (सर्व रा.महूद) महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक)अधिनियम २०१७ (३/४) भा.न्या. संहिता कलम ३५२,३५१ (२) ३५१ (३),११८(१), ११९(१), ११५(२),१४० (३),१८९(२), १९१ (३),१९० आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकाराला मारहाण केल्याबाबत महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती व प्रसार माध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान अधिनियम २०१७ (३/४) प्रमाणे सांगोला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होण्याची सांगोला तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.
यासंदर्भात सविस्तर हकिकत अशी की,फिर्यादी पत्रकार दीपक धोकटे हे रविवारी पहाटे ५.३० वाजण्याचे सुमारास घरातून निघून नेहमीप्रमाणे गावातील महादेव मंदिर येथे दर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी घराच्या समोर गावातील बापू येडगे,हरिश्चंद्र येडगे,प्रकाश कोळेकरसह इतर दोघे दुचाकीवरुन आले आणि त्यांच्यापैकी बापू येडगे यांनी “तू पत्रकार आहे म्हणून,माझी मुलगी पळून जाण्यास मदत केली आहे,आता माझी मुलगी कुठे आहे ? हे तुला माहित आहे” असे दरडावून सांगीतले असता,फिर्यादी धोकटे यांनी “मला तुमच्या मुलीचा पत्ता माहिती नाही” असे समजावून सांगीतले.पण,तरीही त्यांचे कांही ऐकून न घेता,त्या लोकांनी फिर्यादी धोकटे यांना काठीने, एसटीपी पाईपने तसेच लाथाबुक्क्यांने पाठीवर, डोक्यात व पायावर मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीमुळे फिर्यादीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांची पत्नी बाहेर आली व थोड्यावेळाने आई-वडीलांनीही त्या ठिकाणी येवून त्यांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला असता,त्यांनी त्यांनाही धक्काबुक्की केली व त्यांच्याकडील एम एच-४५- ६३८५ या दुचाकीवर बळजबरीने बसवून घेऊन जाऊ लागली.त्यावेळी फिर्यादी त्यांना विरोध करीत होता, परंतु त्यांना मारहाण करीत महूद येथून गार्डी फाटा, खिलारवाडी फाटा या मार्गे पुढे सुपली मार्गे सुपली गावाच्या शिवारात कॅनालवर आणून मारहाण करु लागले.त्यानंतर त्यांना कोणाचातरी फोन आल्यानंतर त्यांनी परत धोकटे यांना गावी महूदला आणून सोडले. यादरम्यान आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची दीड तोळ्याची चेन व रुद्राक्षाची माळही काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
याप्रकरणी,पाच जणांविरुध्द सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.तर,उर्वरित तिघांनाही तात्काळ अटक केली जाईल,असे आश्वासन मंगळवेढा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, सांगोल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे, स.पो.नि.सचिन जगताप व पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी दिले.
——————————————————————
प्रमुख आरोपीला तात्काळ अटक करण्याची पत्रकारांची मागणी :
सदर गुन्हा घडल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ महूद येथे पोलीस पथक रवाना करुन,घटनेची माहिती घेऊन फिर्यादीला तात्काळ पोलिस स्टेशनला आणण्यास मदत केली व गुन्हा दाखल केला.सदर गुन्ह्याचा तपास मंगळवेढा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड हे करीत आहेत. या मोकाट आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी व या गुन्ह्यातील फूस लावणारा प्रमुख आरोपी कोण आहे ? त्यालाही त्वरीत अटक करावी,अशी मागणी सांगोल्यातील पत्रकार बंधूंनी केली आहे.
——————————————————————————