मुलगी जन्माला आल्यास,नाॅर्मल प्रसूती मोफत करण्याच्या खंडागळे हाॅस्पीटलच्या उपक्रमाचे होतेयं कौतुक
सांगोला :
मुलीच्या जन्माचे स्वागत करत “बेटी बचाओ,बेटी पढाओ” तसेच “मुलगी वाचवा,देश वाचवा” अशा घोषणा,प्रचार आणि प्रसार करुन शासन व अनेक सामाजिक संघटना मुली जन्माला याव्यात, यासाठी विवीध उपक्रम राबवत असतात.सांगोल्यातील वैद्यकिय क्षेत्रात विवीध योजना जाहीर करुन रुग्णांना कमी खर्चात उपचार व सेवा देणारे डाॅक्टर दांपत्य म्हणून नांवाजलेल्या डाॅ.परेश खंडागळे व डाॅ.स्वाती खंडागळे यांनीही याबाबत केवळ घोषणाच न करता थेट अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून आपल्या सांगोला येथील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गरोदर महिलेला मुलगी जन्माला आल्यास नाॅर्मल प्रसूतीसाठी येणारा दवाखान्याचा संपूर्ण खर्च माफ करण्याचा एक अभिनव उपक्रम सुरु केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मुलांप्रमाणे मुलीच्या जन्माचेही तितकेच कौतुक व स्वागत व्हावे,मुलींचा जन्मदर वाढावा,या उद्देशाने खंडागळे मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलच्या वतीने स्त्रीजन्माचे अनोखे स्वागत करत नाविण्यपूर्ण उपक्रम राबवला जात असून कन्यारत्न प्राप्त होणार्या गरोदर महिलेच्या नाॅर्मल डिलीव्हरीचे संपूर्ण बील माफ केले जाणार आहे.एवढेच नव्हेतर,मुलगी जन्माला आल्यानंतर प्रसूती दरम्यान सिझेरियन करावे लागले तरी,खर्चाच्या बीलात सवलत दिली जाणार असल्याची माहिती डाॅ.परेश खंडागळे व डाॅ.स्वाती खंडागळे यांनी दिली.
नाॅर्मल प्रसूतीसाठी येणारा दवाखान्याचा संपूर्ण खर्च माफ करण्याचा हा अभिनव उपक्रम अमर्याद काळासाठी सुरु ठेवण्याचा मानस व्यक्त करुन या अभिनव उपक्रमाचा व योजनेचा लाभ सांगोला शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा,असे आवाहन डाॅ.परेश खंडागळे व डाॅ.स्वाती खंडागळे यांनी केले आहे.
——————————————————————————