शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये इंडक्शन प्रोग्राम संपन्न
सांगोला :
सांगोला येथील रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित,शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४- २५ मधील प्रथम व थेट द्वितीय वर्ष नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करुन नव प्रवेशित विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.ए.देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.आर.ए.देशमुख यांनी, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ,मुंबई यांचा अभ्यासक्रम,परीक्षा पद्धती,गुणदान या बाबी विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिल्या.त्याचबरोबर, विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना थेअरी बरोबरच प्रॅक्टिकललाही महत्व दिले पाहिजे, असे ते म्हणाले.नवप्रवेशित विद्यार्थ्यांना कॉलेजच्या सर्व विभागाची माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कॉलेजच्या व्यवस्थापनाने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांचीही त्यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी नियमित कॉलेजमध्ये उपस्थित राहून अभ्यास केल्यास ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतील,असेही ते म्हणाले.
सदर कार्यक्रमास संगणक विभाग प्रमुख प्रा.महेश दौंड,प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा.पी.जी.पवार,यंत्र अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा.संदीप बावचे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख प्रा.आनंद गायकवाड,स्थापत्य अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा.पृथ्वीराज लिगाडे उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.पी.जी.पवार यांनी केली तर,आभार प्रा.संदीप बावचे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
——————————————————————————