अभिनव पब्लिक स्कूलमध्ये ‘अभिनव बिग बझार’ उपक्रम उत्साहात संपन्न

सांगोला :

                   सांगोला तालुक्यातील अजनाळे येथील अभिनव पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेला “अभिनव बिग बझार ” हा उपक्रम सोमवारी अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अजनाळे गावच्या सरपंच दिपाली लाडे,उपसरपंच तेजस्विनी चव्हाण,संस्थाध्यक्ष शिवाजी लाडे सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका कावेरी लाडे मॅडम उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच फीत कापून करण्यात आली.यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या व्यवहार कौशल्यासाठी हा अतिशय उपयुक्त उपक्रम असून अभिनव स्कूल नेहमीच अशा वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करत विद्यार्थी विकासास चालना देत असते,असे मत व्यक्त केले.या उपक्रमास पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी या बिग बझारसाठी विविध प्रकारचे साहित्य आणले होते.यामध्ये भाजीपाला,फळभाज्या व विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच भोगी व संक्रातीसाठी लागणारे साहित्य,इमिटेशन ज्वेलरी,वेगवेगळे बी-बियाणे,रोपे यांचा समावेश होता.या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव मिळाला.विक्री करताना संवाद कौशल्य,नियोजन आणि जबाबदारीची जाणीव तसेच आत्मविश्वास वाढताना स्पष्टपणे दिसून आला.पालक व ग्रामस्थांनी दिलेले प्रेम, प्रोत्साहन व सहकार्य विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरले.या उपक्रमामधून विद्यार्थ्यांनी केलेल्या विक्रीमुळे सर्वसाधारणपणे ७० हजार रुपयांपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल झाली,ही विशेष उल्लेखनीय बाब होय.

या कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांकडून खरेदी करुन त्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्व पालकांचे व ग्रामस्थांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले. अशाच सहकार्यामुळे शाळेत नाविन्यपूर्ण व शैक्षणिक उपक्रम यशस्वीपणे राबवता येतात,असे मत मुख्याध्यापिका यांनी व्यक्त केले.या यशस्वी उपक्रमाबद्दल सर्व उपस्थित मान्यवर,पालकवर्ग व ग्रामस्थांचे अभिनव पब्लिक स्कूल परिवारातर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले व पुढेही असेच प्रेम व सहकार्य लाभो,ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक,विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे हा उपक्रम अतिशय सुयोग्य रीतीने पूर्ण झाला.
—————————————————————