आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा,तरच आयुष्यात यश मिळेल – सहा.कार्य.अभियंता नलवडे
शिवाजी पॉलिटेक्निकमध्ये अभियंता दिन उत्साहात संपन्न

शिवाजी पॉलिटेक्निकमध्ये अभियंता दिन उत्साहात संपन्न
सांगोला :
आधी स्वतःला विकसित करा,तरच तुमचे घर,तुमचे कुटुंब,तुमचे गाव व तुमचा देश विकसित होईल आणि तुमची प्रगती होईल. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नियोजन व त्याची योग्य अंमलबजावणी किती महत्त्वाची आहे ? हे स्पष्ट करत आपण जे कांही टार्गेट ठेवले आहे,ते मिळवण्यासाठी हे दोन्ही घटक आवश्यक आहेत. तसेच आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा,तरच आयुष्यात यश मिळेल,असे मत म्हैसाळ कालवा उपविभाग क्र.१,सांगोलाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता मयूर नलवडे यांनी अभियंता दिनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अभियंता दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून म्हैसाळ कालवा उपविभाग क्र.१,सांगोलाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता मयूर नलवडे तसेच म्हैसाळ कालवा उपविभाग क्र.२,सांगोलाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता गोसावी हे उपस्थित होते.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड तसेच संस्थेचे उपाध्यक्ष महादेव गायकवाड व सचिव अंकुश गायकवाड हे ही उपस्थित होते.
यावेळी,सहाय्यक कार्यकारी अभियंता गोसावी यांनी विद्यार्थ्यांना एक अभियंता म्हणून त्यांची समाजाप्रती असलेली जबाबदारी समजावून सांगितली.त्यांनी जलसंपदा विभागातील विविध पदांविषयी माहिती दिली,ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी योग्य दिशा निवडता येईल.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या न्यूनगंडावर बोलताना त्यांनी,हा न्यूनगंड दूर करण्याचा सल्ला दिला आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्यास प्रोत्साहित केले. सोशल मीडियाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, “सोशल मीडियाचा योग्य वापर करा,गैरमार्गाकडे जाणे टाळा.आपल्या आयुष्यात स्पष्ट ध्येय ठेवून सातत्याने काम केले पाहिजे.” यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याचे महत्त्व पटवून दिले आणि सांगितले की,“कॉलेज जीवनात उपलब्ध असलेल्या जास्तीत जास्त साधनसंपत्तीचा योग्य वापर करुन आपले सर्वोत्तम ध्येय गाठावे, त्यातूनच खऱ्या अर्थाने प्रगती साधता येते.”
आपल्या अध्यक्षीय भाषणात बाबुराव गायकवाड म्हणाले की, स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालये सुरु झाली.त्यांनी पुढे सांगितले की, दादांनी मराठी विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे दरवाजे खुले केले.त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची संधी मिळाली आणि त्याचा मोठा फायदा झाला.संस्थेचे उपाध्यक्ष महादेव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा व कष्ट यांचे महत्त्व पटवून देत सांगितले की,“मोठेपणा हा शिक्षण,डिग्री किंवा पैशावर अवलंबून नसून तो परिश्रम,सखोल अभ्यास व प्रामाणिक आचरण यातून सिद्ध होतो.” त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करुनच पुढे गेले पाहिजे, असे सांगून अभ्यास करताना परिपूर्ण माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.जे कांही कराल ते मनापासून आणि प्रामाणिकपणे केले पाहिजे,असा सल्ला दिला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.यानंतर,प्राचार्य यांनी आपल्या प्रास्ताविकेत प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन देत भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.प्राचार्यांनी सांगितले की,सर विश्वेश्वरय्या यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात भरीव योगदान दिले असून म्हैसूर राज्याचे दिवाण म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या कार्याची दखल घेत इंग्रज सरकारकडून “सर” ही पदवी तसेच भारत सरकारकडून “भारतरत्न” हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला होता.यावेळी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना संदेश देताना म्हंटले की,विद्यार्थी दशेत तर्कसंगती,नाविन्यता आणि प्रामाणिकपणा आचरणात आणणे आवश्यक आहे.
यावेळी,संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.यानंतर तनुजा मोरे या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.एस.डी.बावचे यांनी केले.
——————————————————————————