महत्वाच्या बातम्या

नीरा उजवा कालव्याचे आवर्तन १५ ऑक्टोबरपर्यंत सुरु ठेवावे – आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केली मुख्यमंत्र्याकडे मागणी

सांगोला :

                   सांगोला विधानसभा मतदार संघात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असून नीरा उजवा कालव्याचे सध्या सुरु असलेले आवर्तन वेळेपूर्वी बंद न करता ते १५ ऑक्टोबर पर्यंत सुरुच ठेवावे, अशी मागणी सांगोल्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वीर धरणातून नीरा उजवा कालव्याच्या खरीप हंगाम (२०२६-२७ च्या) सिंचन आवर्तनाबाबत महत्त्वपूर्ण मागणी केली.यावर्षी सांगोला तालुक्यासह पंढरपूर तालुक्यातील संबंधित कार्यक्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज निर्माण झाली आहे. सांगोला मतदारसंघातील चिंचोली तलाव तसेच तिसंगी व सोनके येथील तलाव यांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे असून सदर भागातील उभी पिके वाचविण्यासाठी तसेच आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता,नीरा उजवा कालव्याचे सध्या सुरु असलेले आवर्तन वेळेपूर्वी बंद न करता दि.१५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सुरु ठेवणे आवश्यक असल्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.

शेतकरी व नागरिकांच्या हिताचा विचार करुन वीर धरणातून नीरा उजवा कालव्याचे खरीप हंगाम २०२६-२७ चे आवर्तन १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सुरु ठेवण्याबरोबरच तिसंगी,सोनके (ता.पंढरपूर) व चिंचोली तलाव (ता.सांगोला) येथे आवश्यकतेनुसार पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश देण्यात यावेत,अशी मागणी केली असता मुख्यमंत्री महोदयांनी आमदारांची मागणी गांभीर्याने ऐकून घेतली असून याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने दुष्काळी परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या पाणीपुरवठ्याच्या समस्येवर निश्चितपणे तोडगा निघेल,अशी आशा व्यक्त केली जात आहे.
===========================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button