डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयात 35 व्या वर्धापन दिनासह कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन – डॉ.अनिकेतभैय्या देशमुख

सांगोला :

येथील डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयात बुधवार,दि. 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वा.महाविद्यालयाचा 35 वा वर्धापन दिन व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 139 व्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिकेतभैय्या देशमुख यांनी दिली.

या कार्यक्रमाचे आयोजन सांगोला येथील डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय तसेच न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक,प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम,सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून महाविद्यालयाचा वर्धापन दिन हा संस्थेच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक वाटचालीचा आढावा घेण्याचा,संस्थेच्या प्रगतीमध्ये योगदान देणाऱ्या सर्व घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा तसेच भविष्यातील शैक्षणिक विकासाची दिशा निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण दिवस आहे.त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या ‘कमवा व शिका’ या शिक्षणविषयक विचारांचे व बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण केले जाणार आहे.

               या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे पीएम-उषा समन्वयक डॉ.प्रभाकर कोळेकर हे उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिकेतभैय्या देशमुख हे आहेत.तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे सचिव विठ्ठलराव शिंदे सर व सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे.न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिकचे प्राचार्य दिनेश शिंदे,माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा.केशव माने तसेच डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर धसाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या शैक्षणिक प्रगतीचा गौरव करताना विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण,संशोधन,कौशल्यविकास व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणे,हा या वर्धापन दिन सोहळ्याचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.      ===================================