स्व.आबासाहेबांनी उभा केलेल्या शेकापच्या एकसंघ साम्राज्याला घरातूनच सुरुंग ?
सांगोला : सुमारे ५५ ते ६० वर्षे अहोरात्र झटून व अपार कष्ट करुन सांगोला तालुक्यातील जनतेच्या मनावर शेतकरी कामगार पक्षाची तत्त्वे व ध्येयधोरणे बिंबवणारे,एकाच विधानसभा मतदार संघातून तब्बल ११ वेळा निवडून येणारे, आपल्या तत्त्वाशी कधीही तडजोड न करता राजकारण करणारे,महाराष्ट्र राज्याचे माजी कृषीमंत्री आणि सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्व.डाॅ.आबासाहेब तथा गणपतराव देशमुख यांनी अनेक टक्केटोणपे खात आपल्या राजकिय कारकिर्दीत सांगोला तालुक्यात शेकापचे एक अथांग साम्राज्य तयार केले आहे. परंतु,हे काय ? त्यांनी उभा केलेल्या शेकापच्या एकसंघ साम्राज्याला त्यांच्या निधनानंतर अवघ्या वर्षभरातच आणि ते ही त्यांच्या घरातूनच सुरुंग लागत असेल तर, याच्याइतकं दुर्दैव आणखी काय असणार आहे ? परंतु त्यामुळे, शेकाप कार्यकर्ते मात्र द्विधावस्थेत असल्याचे दिसून येत आहे.
आबासाहेबांचा राजकिय वारस कोण ? डाॅ.अनिकेत की, डाॅ.बाबासाहेब ?
तीन वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीदरम्यान तब्येतीच्या कारणावरुन स्वत: निवडणूक न लढविता स्व.आबासाहेबांनी अगदी निवडणूकीच्या तोंडावर आपला नातू डाॅ.अनिकेतला उमेदवारी दिली आणि राजकारणात नवखा असलेल्या डाॅ.अनिकेतचा अगदी निसटता पराभव झाला. डाॅ.अनिकेतचा निष्पाप व निरागसपणा त्यावेळी निवडणूकी दरम्यान संपर्कात आलेल्या शेकाप कार्यकर्त्यांना खूप भावला,त्यामुळे हा निसटता पराभव सर्वांनाच जिव्हारी लागला. पण पुढे निवडणूकीतील पराभवानंतर डाॅ. अनिकेतचा मतदारसंघातील जनतेशी म्हणावा तेवढा संपर्क राहिला नाही.
डाॅ.बाबासाहेबांमध्ये आबासाहेबांची छबी
दरम्यानच्या काळात, स्व. आबासाहेबांच्या निधनानंतर आबासाहेबांचे दुसरे नातू डाॅ.बाबासाहेबांनी सांगोला तालुक्यातील जनतेशी आपला संपर्क वाढवून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली.एवढेच नव्हेतर,शेकाप कार्यकर्त्यांच्या सुखदु:खाच्या प्रसंगातही हजेरी लावून त्यांना आबासाहेबांची कमतरता भासू दिली नाही. त्यामुळे, हळुहळू लोकांच्या मनात डाॅ. बाबासाहेबांबद्दलची क्रेझ वाढू लागली आणि बाबासाहेबांमध्ये त्यांना आपल्या लाडक्या नेत्याची (आबासाहेबांची) छबी दिसू लागली. त्यामुळे,आबासाहेबांचा राजकिय वारस डाॅ.बाबासाहेबच अशी सर्वांची धारणा होवू लागली.
एकंदरीत,शेकापची अशी वाटचाल चालू असताना, मागील पंधरवड्यापासून डाॅ.बाबासाहेब हे आजारपणामुळे अज्ञातवासात असताना, अचानक डाॅ.अनिकेत यांनी सांगोल्यात हजेरी लावून कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि “आपण सर्वजण एकसंघ राहून स्व. आबासाहेबांना अभिप्रेत असलेला विचार पुढे नेवू”,अशी प्रतिक्रिया दिली. डाॅ.अनिकेतना बोलायचे ते बोलून गेले पण, त्यामुळे शेकापमध्ये सर्वकांही आलबेल आहे, असे कांही नाही,अशी चर्चा होवू लागली.
आता नगरपरिषद,पंचायत समिती व जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर आलेल्या असताना तालुक्यात एक बलाढ्य पक्ष असलेल्या शेकापच्या नेतृत्वाबाबत स्व.आबासाहेबांच्या घरातूनच वेगवेगळी भूमिका घेवून कधी डाॅ.बाबासाहेब तर कधी, डाॅ. अनिकेत पुढे येत असतील तर, कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणूकी वेळी नेमके कुणाच्या पाठीशी उभे राहायचे ? असा संभ्रम शेकापच्या गोटात निर्माण झाला आहे.
विधानसभा निवडणूकीत शेकापचा उमेदवार कोण ?
बलाढ्य विरोधकाला ऐनवेळी टक्कर कशी देणार ?
विधानसभा निवडणूकही अवघ्या दोन वर्षावर आली असताना आबासाहेबांचा राजकिय वारस
डाॅ.अनिकेत की, डाॅ.बाबासाहेब ? या संभ्रमात कार्यकर्ते राहीले तर, “दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ” या उक्तीप्रमाणे यापूर्वी हातात कांहीच नसताना डांगडिंग करुन निवडणूकीत आबासाहेबांचीही दमछाक करणार्या शेकापच्या परंपरागत विरोधकाजवळ आतातर, “पन्नास खोके,एकदम ओक्के” अशी मजबूत परिस्थिती असताना “तू तू ..मैं मैं”च्या वादात ऐनवेळी निवडणूकीत टक्कर कशी देणार ? असा सवाल कार्यकर्त्यांना पडला आहे.
शेकापची दोन नंबरची फळी गप्प का ?
स्व.आबासाहेबांच्या छत्रछायेखाली मोठमोठी पदे उपभोगून आपली सर्वांगीण प्रगती साध्य करुन घेणारी शेकापची दोन नंबरची फळी मात्र याबाबतीत गप्प का ? हे एक कोडेच असून डाॅ.अनिकेत की, डाॅ. बाबासाहेब ? हा तिडा सोडवण्यात ते का रस घेत नाहीत ? याबाबत शेकाप कार्यकर्त्यांमधून उलटसुलट चर्चा होत असून या दोघांमध्ये असाच वाद वाढत गेल्यास कदाचित आपल्याला उमेदवारीचा चान्स मिळू शकतो,अशी अपेक्षा मनात ठेवूनच ही दोन नंबरची फळी हा तिडा सोडवण्यासाठी पुढे येत नसावी,अशी शंकाही शेकापच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे, कार्यकर्त्यांमध्ये या दुसर्या फळीतील नेतेमंडळीबाबत अशी शंका येवू नये आणि आपल्या लाडक्या नेत्याच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी पुढाकार घेवून त्यांनी आबासाहेबांच्या घरगुती वादावर तोडगा काढला तरच पुन्हा शेकापचे साम्राज्य संपूर्ण तालुक्यावर पूर्वीप्रमाणे टिकून राहील,हे निश्चीत.
चंद्रकांतदादांची भूमिका काय ?
सांगोला तालुक्यात तत्कालीन काँग्रेसचा मोठा वर्ग असताना, कार्यकर्त्यांची फळी उभी करायला आबासाहेबांना किती कष्ट घ्यावे लागले व तालुक्यातील शेकापच्या कार्यकर्त्यांच्या आता काय भावना आहेत ? हे स्व.आबासाहेबांचे सुपूत्र व शेकापचे जेष्ठ नेते चंद्रकांतदादा सुरुवातीपासूनच स्व.आबासाहेबांच्या सानिध्यात राहिल्याने त्यांना याची चांगली जाणीव आहे. आता डाॅ. अनिकेत की, डाॅ.बाबासाहेब ? या संदर्भात त्यांनीच जाणतेपणाने योग्य तो तोडगा काढून व पक्षाचा एखादा मेळावा घेवून त्यामध्ये आबासाहेबांच्या राजकिय वारसाची घोषणा केल्यास कार्यकर्त्यांना दिलासा मिळेल,हे नक्की.
—————————————————————————
दोघांचे भांडण ….तिसऱ्याचा लाभ ही गोष्ट शेकाप साठी आजपर्यंत फायदेशीर ठरली आहे .तुम्ही चुकीच्या माथी ही म्हण वापरताय
आजपर्यंत दोघांचे भांडण ..तिसऱ्याचा लाभ ही गोष्ट शेकपसाठी फायदेशीर ठरली आहे .तुम्ही ज्यांना विरोधक म्हणताय त्यांचे आजपर्यंत नुकसान झाले आहे .तुम्ही ऊद्धृत केलेली म्हण खऱ्या अर्थाने अशी लागू होते;तुम्ही या म्हणीचा उलतावणी अयोग्य वापर केलाय