शारदादेवी महिला सेवा कार्यालयातून महिलांना त्यांचा हक्क मिळेल – आमदार रोहित पाटील
सांगोला येथे शारदादेवी महिला सेवा कार्यालयाचे उदघाटन संपन्न

सांगोला येथे शारदादेवी महिला सेवा कार्यालयाचे उदघाटन संपन्न
सांगोला :
स्व.शारदादेवी साळुंखे-पाटील तथा सर्वांच्या लाडक्या काकींनी संपूर्ण आयुष्यभर उपेक्षित व दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतली.त्यांनी कधीच जाती पातीचा आणि पक्ष पार्टीचा विचार केला नाही. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन सांगोला येथे सुरु करण्यात आलेल्या शारदादेवी महिला सेवा कार्यालयातून सांगोला शहर व तालुक्यातील पीडित महिलांना नक्कीच न्याय मिळेल,असा विश्वास आमदार रोहित (आर.आर.आबा) पाटील यांनी व्यक्त केला.
सांगोला येथे सुरु करण्यात आलेल्या शारदादेवी महिला सेवा कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी आमदार रोहित पाटील हे बोलत होते.यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले की,सांगोला शहर व तालुक्यातील अनेक महिलांना घरगुती,सामाजिक,शैक्षणिक व आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशावेळी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी त्यांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळावे,याच भावनेतून सांगोला येथील महिलांनी स्वतः पुढे येऊन शारदादेवी महिला सेवा कार्यालय सुरु केले असून या कार्यालयातून महिलांना त्यांचा हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी नक्कीच मदत होईल,असा आशावादही शेवटी आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी,माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, तानाजी काका पाटील,माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे,माजी नगरसेवक सिद्धेश्वर उर्फ नाथा जाधव व सचिन लोखंडे तसेच राणी उर्फ आफरीन शेख,रेश्मा खतीब,पुजा बोराटे,संध्या काटे व शोभा शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
——————————————————————————
सेवा कार्यालयातून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार :
स्व.शारदादेवी साळुंखे-पाटील यांच्या विचारातून आणि संस्कारातून सुरु झालेल्या या सेवा कार्यालयातून सांगोला तालुक्यातील गोरगरीब, दीनदलीत,बहुजन व शेतकरी- शेतमजूर महिलांचे प्रश्न सुटावेत,हीच आमची अपेक्षा आहे.सांगोला तालुक्यातील दीनदलीत,पीडित, उपेक्षित व शेतमजूर महिलांना या सेवा कार्यालयातून नक्कीच हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
– दीपकआबा साळुंखे-पाटील