विवीध उद्योगातून रोजगार निर्मिती करणारा सांगोल्याचा सूर्योदय परिवार सामाजिक बांधिलकीतही अग्रेसर – अविनाश भारती
सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न
सांगोला :
जगातील अनेक देशांची वृद्धत्वाकडे वाटचाल सुरु असताना आपला भारत देश मात्र तरुणांचा देश म्हणून समोर येत आहे.या देशातील युवाशक्तीला योग्य मार्गाला वळवणे अत्यंत गरजेचे असून आपल्या महाराष्ट्रात एलकेपी मल्टीस्टेट, सूर्योदय अर्बन,सूर्योदय अर्बन महिला,सूर्योदय मॉल,वस्त्रनिकेतन व फर्निचर मॉल त्याचबरोबर सूर्योदय दूध विभाग यासारख्या विवीध उद्योगांच्या माध्यमातून युवकांच्या हाताला काम देत मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारा हा सूर्योदय परिवार सामाजिक बांधिलकी जपण्यात देखील अग्रेसर असल्याचे गौरवोदगार महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते व कवी अविनाश भारती यांनी व्यक्त केले.
सांगोला येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहामध्ये पंढरपूर,मोहोळ,मंगळवेढा व सांगोला या चार तालुक्यातील शिक्षक बंधू-भगिनींच्या विराट गर्दीत सूर्योदय परिवारातील सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला शिक्षकदिन कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात अनेक मजेदार परंतु चिंतनीय दाखले देत प्रत्येकाच्या जीवनातील गुरुंचे अनन्य साधारण असलेले महत्त्व विशद करुन “गुरु हाच खरा जीवनाचा शिल्पकार” या विषयावर कवी अविनाश भारती हे बोलत होते.यावेळी उपस्थितांच्या आवडीची दखल घेत मधुर आवाजात अनेक कविता सादर करत आपल्या पहाडी आवाजातील मार्गदर्शनाने सर्व उपस्थितांना सुमारे दोन तास त्यांनी अक्षरशः खिळवून ठेवले.
यावेळी मंचावर सूर्योदय फाउंडेशनचे अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले,पोलीस निरीक्षक विनोद घुगे, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी,ब्रह्मा ग्रुपचे मारुती माळी,सूर्योदय दूध विभागाचे चेअरमन डॉ.बंडोपंत लवटे,सूर्योदय उद्योग समूहाचे सहसंस्थापक जगन्नाथ भगत, एलकेपी मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन सुभाष दिघे,पांडुरंग ताटे,विनोद पाटील,प्रशांत पाटील तसेच सूर्योदय महिला अर्बनच्या चेअरमन सौ.अर्चनाताई इंगवले,व्हा.चेअरमन ज्योती भगत,संचालिका सुरेखा लवटे,मीनाक्षी दिघे,डॉ.यशश्री इंगवले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी,सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी प्रस्ताविकामध्ये एलकेपी मल्टीस्टेट, सूर्योदय अर्बन या संस्थांच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती सांगत सूर्योदय ग्रुपमधील अनेक उद्योग व्यवसाय आणि विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम याबाबत माहिती दिली व व्यापक स्वरुपात केलेल्या वृक्ष लागवडीबाबत आणि त्याच्या संवर्धनासाठी शाळा स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धांबद्दल सखोल माहिती सांगितली.यावेळी बीडीओ कुलकर्णी,पीआय विनोद घुगे, मारुती माळी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
सूर्योदय फाउंडेशनचे उपाध्यक्ष जगन्नाथ भगत यांनी यावेळी बोलताना सूर्योदयच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती सांगत सूर्योदय वस्त्रनिकेतन आणि फर्निचर मॉलमध्ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने सूर्योदयच्या वतीने शिक्षकांसाठी ३ दिवसांकरिता १० टक्के सवलतीची ऑफर घोषित केली.यावेळी सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने शिक्षकदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने चार तालुक्यातील सुमारे ९१ शिक्षक व १९ शाळांना पुरस्काराने गौरविण्यात आले. सर्व आदर्श शिक्षकांना व आदर्श शाळांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
सूर्योदय ग्रुपचे देखणे व नेटके नियोजन,मन तृप्त करणारा वक्ता, आपुलकीने सेवा देणारा कर्मचारीवृंद आणि सूर्योदयाच्या आवाहनाला प्रतिसाद देत झालेली सारस्वतांची अलोट गर्दी तसेच सर्वांसाठी केलेली स्नेहभजनाची उत्तम सोय यामुळे “सन्मान गुरुजनांचा” हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
——————————————————————————