सांगोल्यात ओला दुष्काळ जाहीर करा – आमदार डॉ.बाबासाहेबांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सांगोला :
सांगोला विधानसभा मतदार संघातील विवीध गांवात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.या पार्श्वभूमीवर,सांगोल्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
सांगोला विधानसभा मतदार संघात ॲागस्ट महिन्यापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे शेत जमिनींमध्ये पाणी साचले असून,पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.विशेषत: महिम,आलेगाव,कडलास,महूद, सोनंद,वाटंबरे,अकोला,जवळा आणि आगलावेवाडी या गावांमध्ये पावसाच्या तीव्रतेमुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरांना आणि शेतांना आर्थिक झळ बसली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे.आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील परिस्थिती सांगताना, ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले असून शासनाने तात्काळ हस्तक्षेप करुन ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा शेतकरी आणखी संकटात सापडतील.त्याचबरोबर,मृतांना १० लाख रुपयांची मदत आणि नुकसान ग्रस्तांना प्रति एकर १ लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी त्यांनी पुन्हा पुन्हा अधोरेखित केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सांगोला मतदार संघातील सद्य: परिस्थितीची तात्काळ चौकशी करुन मदत केली जाईल,असे सांगितले.आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून मदतीची मागणी केल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
——————————————————————————
मृतांना १० लाख तर, नुकसानग्रस्तांना प्रति एकर १ लाखाची मदत द्यावी :
महिम,आलेगाव,जवळा व आगलावे वाडी या गावांतील मृतांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकर १ लाख रुपयांची तात्काळ मदत द्यावी.
– आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख