नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करावी – डॉ.परेश खंडागळे

सांगोला :

संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह सोलापूर जिल्ह्यात व विशेषत: सांगोला तालुक्यात अतिवृष्टीमुळे
सर्वसामान्य शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले असून उभी पिके पाण्यात गेल्याने आणि त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असल्याने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करावी,अशी मागणी
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ.परेश खंडागळे यांनी सरकार व प्रशासनाकडे केली आहे.

                 अतिवृष्टीमुळे सांगोला तालुक्यात गोरगरीब नागरिकांबरोबरच शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसला असून अशा संकटसमयी त्यांना आर्थिक मदत करुन दिलासा देणे अत्यावश्यक असल्याचे सांगून डॉ.परेश खंडागळे पुढे म्हणाले की,अतिवृष्टी झालेल्या संपूर्ण भागात सरसकट पंचनामे करण्यात यावेत,शेतकरी बांधवांची संपूर्ण कर्जमाफी करावी,ओला दुष्काळ जाहीर करावा,नुकसान भरपाईची अनुदान रक्कम वाढवून मिळावी,शेतकरी बांधवांची सर्व कर्जांची बँक वसुली व शैक्षणिक तसेच महसूल कर वसुली थांबवावी,दसरा व दिवाळी सण जवळ आल्याने शेतकऱ्यांना दिवाळीसाठी एक विशेष पॅकेज व किट देण्यात यावे,जी जनावरे दगावली आहेत,त्यासाठी योग्य तो मोबदला मिळावा, अतिवृष्टीमुळे विजेच्या उपकरणांचे नुकसान झालेले असून त्यासाठी योग्य ती मदत मिळावी,विद्युत मंडळांना सांगून लवकरात लवकर लाईटचे पोल व डीपीची कामे करुन द्यावीत आणि नुकसान झालेल्या घरांसाठी योग्य ती तात्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी डॉ.परेश खंडागळे यांनी सरकार व प्रशासनाकडे केली आहे.
——————————————————————————