सांगोला हे सुंदर शहर म्हणून ओळखले जाईल – आम.शहाजीबापू
सांगोला : सांगोला शहर व तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाट्टेल ती मदत करण्यास तयार असून आगामी दोन वर्षात तुम्ही फक्त कामे सुचवा, ती कामे पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. शहराचा चौफेर विकास झाल्याने येत्या कांही दिवसात सांगोला शहर हे सर्व सोईसुविधांनी युक्त असे सुंदर शहर म्हणून ओळखले जाईल,अशी ग्वाही तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांनी शहरातील इदगाह मैदानाचे सुशोभिकरण व इतर विकासकामांच्या 3 कोटी १८ लाख रु. खर्चाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना दिली.
सांगोला शहरातील ईदगाह मैदानाच्या सुशोभिकरण कामाचा त्याचबरोबर पुजारवाडी भागातील रस्ते व इतर विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आम.शहाजीबापू पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडला. यावेळी आम.शहाजीबापू हे बोलत होते. यावेळी फॅबटेक उद्योग समुहाचे सर्वेसर्वा भाऊसाहेब रुपनर,भाजपाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ, नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे,हाजी शब्बीरभाई खतीब,माजी नगरसेवक दिलावरभाई तांबोळी, जुबेर मुजावर,आलमगिर मुल्ला,
उद्योगपती नाथा (मालक) जाधव,ज्येष्ठ पत्रकार हमीदभाई इनामदार,उद्योगपती बाळासाहेब आसबे, प्रा.संजय देशमुख सर,युवा नेते योगेश खटकाळे,बशीरभाई तांबोळी,बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे, आरपीआय तालुकाध्यक्ष खंडूतात्या सातपुते, हाजी युसूफ मुलाणी, निसारभाई तांबोळी,राजू खाटीक, इलाही बागवान,इसाक तांबोळी, इमरान काझी, सतीश बनसोडे, फिरोज मणेरी, अच्युत फुले, नगरपरिषद बांधकाम अभियंता अभिराज डिंगने, इंजि.मोईन इनामदार, इंजि.आकिश करे, ठेकेदार इंजि.धनाजी राउत, किशोर बनसोडे, बाबासाहेब बनसोडे इ.मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आम.शहाजीबापू पाटील म्हणाले की, शहरातील ईदगाह मैदानाची अत्यंत दुरावस्था झाली होती. मुस्लीम बांधवाना याठिकाणी ईदची नमाज पठण करणे गैरसोईचे झाले होते,ते सर्व सुविधांनी सुसज्ज व्हावे अशी अनेकांची भावना होती आणि ती गरज ही होती. या कामात त्यांच्या जेवढ्या भावना गुंतलेल्या होत्या, तेवढ्याच भावना माझ्याही गुंतल्या होत्या. त्यामुळे गेल्या वर्षी दिलेल्या वचनाप्रमाणे या ईदगाह मैदानाच्या कामाचा शुभारंभ आज होत आहे. योगायोगाने आज हे काम माझ्या हातून होत आहे याचा अहंकार नाही. परंतु मला हे काम करण्यासाठी संधी मिळाली, हा परमेश्वराचा आशीर्वाद आहे असे समजतो. यापूर्वी २५ लाख रुपये दिले होते. आता नव्याने दीड कोटी रुपये दिले आहेत. त्यानंतर काल पुन्हा २५ लाख रुपये याच कामासाठी वाढीव दिले असून एकूण दोन कोटी रुपये या कामासाठी आपल्याकडे आहेत. या पुढील काळात निधी कमी पडू देणार नाही. परंतु हे काम अतिशय देखणं आणि सुंदर झालं पाहिजे, याची जबाबदारी त्यांनी मुख्याधिकारी व ठेकेदार यांचेवर सोपवली. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात देखणे असे ईदगाह मैदान सांगोल्यात उभा राहीले पाहिजे असे सांगत, कब्रस्तानचा विषय देखील लवकरच मार्गी लावू, असा शब्द आम. शहाजीबापू पाटील यांनी यावेळी दिला.
यावेळी ते पुढे म्हणाले की, भुयारी गटार योजनेच्या कामाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, शहरातील सर्व रस्ते कॉंक्रिटीकरण करण्याचा विचार आहे. त्याबाबतही लवकरच निर्णय घेऊ, मध्यवर्ती इमारत बांधकामाचे नियोजन असून त्याही कामाचा शुभारंभ लवकरच होणार आहे. आरटीओ ऑफिस इमारत मंजुरीच्या टप्प्यात आहे. सांगोला शहराचा परिसर हा इतर तालुक्याच्या तुलनेत देखणा करून दाखवू असे सांगत, जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिले आहे, त्या विश्वासाला प्रामाणिक राहून विकास कामे मोठ्या प्रमाणात केली जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले, अनेक वर्षापासूनची असलेली मुस्लिम समाजाची मागणी या निमीत्ताने पूर्ण होत असून नवीन विकासाचे पर्व आपल्या सांगोल्यात सुरू होत आहे, याचा आनंद आहे. सांगोला शहराचा झपाट्याने चौफेर विकास होत असताना, सुसज्ज आणि अद्यावत असे ईदगाह मैदान राज्यातील इतर समाज बांधवांनी बघायला यावं, असे मॉडेल ईदगाह मैदान आपल्या सांगोल्यात उभा राहणार आहे. मागील अनेक दिवसांपासून रखडलेले काम आज सुरू होत आहे. या कामाची क्वाॅलिटी व क्वाँटिटी उत्तम दर्जाची ठेवावी, अशी जबाबदारी मुख्याधिकारी व ठेकेदार यांचेवर टाकत येत्या काळात सांगोला शहर आणि तालुक्याचा चौफेर विकास करण्यासाठी मी आणि आमदार शहाजीबापू पाटील आम्ही दोघेही कटिबद्ध आहोत. जे काम आपण सांगाल, ते काम मंजूर होईल, असा विश्वासही माजी आम. दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी हाजी शब्बीरभाई खतीब, हमीदभाई इनामदार,चेतनसिंह केदार यांनी आपले विचार व्यक्त केले. आभार जुबेर मुजावर यांनी मानले तर, सूत्रसंचालन बाकीर मुजावर सर यांनी केले.
—————————————————————————