वाकी (शिवणे) विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी दीपकआबा गटाचे अनिल कापसे

संस्थेच्या मालकीची जागा व इमारत पूर्ण झाल्यानंतरच सत्कार स्वीकारणार – दीपकआबा
सांगोला :
सांगोला तालुक्यातील अतिशय सक्षम व जिल्ह्यात नावाजल्या जाणाऱ्या वाकी (शिवणे) विकास सेवा सह.सोसायटीच्या चेअरमनपदी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील गटाचे युवक नेते अनिल कापसे यांची नुकतीच सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
मागील सलग १६ वर्षे १०० टक्के वसुली असणाऱ्या वाकी (शिवणे) विकास सोसायटीमध्ये शिवसेना व दीपकआबा साळुंखे-पाटील गटाची सत्ता असून युती धर्मामध्ये चेअरमन पदासाठी ठरलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन चेअरमन संजय सदाशिव जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर अनिल कापसे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडणुकीसाठी सांगोला तालुका सहकारी निबंधक कार्यालयाचे श्री.शेख यांनी काम पाहिले.चेअरमन पदासाठी अनिल कापसे यांचा एकमेव अर्ज आल्याने श्री.शेख यांनी अनिल कापसे यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
ही निवड झाल्यानंतर माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी त्यांच्या सांगोला येथील संपर्क कार्यालयात नुतन चेअरमनचा सत्कार करुन पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी, सत्काराला उत्तर देताना नूतन चेअरमन अनिल कापसे यांनी आपल्या मनोगतात,माजी आमदार दीपकआबा यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी व सभासदांसह गावाच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करुन संस्थेचे नाव उज्वल करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी मधुकर सपाटे,उद्धव पाटील,शिवाजीराव साळुंखे,तुकारामआबा जाधव,श्रीकांत जाधव,संतोष रोकडे,अनिल जाधव,रघुनाथ पाटील,मच्छिंद्रअण्णा जाधव (गुरुजी) यांचेसह स्थानिक ग्रामपंचायत सदस्य,सोसायटीचे संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————————————
सोसायटीची स्वतःच्या मालकीची जागा व इमारत झाल्यानंतरच सत्कार स्वीकारु
वाकी (शिवणे) येथील ग्रामस्थांनी याप्रसंगी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या सत्कारासाठी हार व मानाचा फेटा आणला असता,दीपकआबांनी त्यांना नम्रपणे नकार देऊन विकास सेवा सोसायटीची स्वतःच्या मालकीची जागा व इमारत झाल्यानंतर हा सत्कार स्वीकारु,असे सांगून वाकी (शिवणे) येथील अतिशय सक्षम असलेल्या विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदावर सर्वांनी अनिल कापसे यांची निवड करुन या पदाला न्याय देणारे योग्य व सक्षम नेतृत्व दिले असल्याचे मत व्यक्त केले.गावच्या विकासासाठी राजकारण विरहीत कामकाज करण्याचा सल्ला देत संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दीपकआबांनी यावेळी दिले.