मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील मिसींग लिंकला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नांव द्यावे – आ.डाॅ.बाबासाहेब देशमुख

सांगोला :
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंकला धनगर समाजाचे आराध्य दैवत वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नांव द्यावे,अशी मागणी सांगोल्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर हे धनगर समाजाचे आराध्य दैवत मानले जाते.शिंग्रोबा धनगर यांचा इतिहास खंडाळा-बोर घाटाशी जोडलेला आहे.ते याच खोऱ्यात वास्तव्यास होते.त्यामुळे,शिंग्रोबा धनगर यांना डोंगर व दऱ्या खोऱ्याची सखोल माहिती होती. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजी अभियंत्याला जे काम जमले नाही,ते काम शिंग्रोबा धनगर यांनी केले.अडाणी असूनही ते अत्यंत तल्लख बुद्धीचे होते. त्याकाळी मुंबई-पुणे लोहमार्ग व रस्ता तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.घाटातून रस्ते कसे व कोठून तयार करायचे ? हा पेच ब्रिटिश अभियंत्यांना सुध्दा पडला होता. त्यावेळी ब्रिटिश शासनाला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांनी योग्य ती माहिती दिली व रस्ता कसा व कोठून तयार करायचा ? ते सांगीतले.
त्यांच्या या कामगिरीवर खुष होऊन ब्रिटिश शासनाने त्यांना कांहीही मागा म्हंटल्यावर,या वीर हुतात्म्यांने “द्यायचेच असेल तर,आम्हाला स्वातंत्र्य द्या”,असे ब्रिटिशांना सांगितले.त्यांच्या या मागणीने ब्रिटिश शासनाने त्यांची गोळ्या घालून हत्या केली.अशा या हुतात्म्यामुळे आज आपणास मुंबई- पुणे रस्ता मिळाला आहे.आजही घाटाच्या मध्यवर्ती ठिकाणी वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे मंदीर आहे.जाणारे-येणारे प्रवासी या मंदीरासमोर नतमस्तक होतात. अशा वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नांव मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंकला द्यावे,अशी मागणी सांगोल्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.——————————————————————————