सांगोल्याच्या दुष्काळी संकटावर तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी आ.डॉ.बाबासाहेब देशमुखांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
दुष्काळाने होरपळणाऱ्या मतदारसंघातील पाणी व चारा प्रश्नावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी

सांगोला :
सांगोला तालुक्यासह संपूर्ण मतदार संघाची दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर
होत चालली असून शेतकरी, शेतमजूर आणि पशुधनासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर,आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांची शुक्रवारी 30 ऑक्टोबर रोजी समक्ष भेट घेऊन सांगोला तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघाच्या दुष्काळी परिस्थितीची सविस्तर माहिती दिली आणि दुष्काळाने होरपळणाऱ्या मतदार संघातील पाणीटंचाई व चाराटंचाईच्या प्रश्नावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी करत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखांनी सांगोल्याच्या दुष्काळी संकटावर तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी
जिल्हाधिकाऱ्यांना चक्क साकडे घातले.
सांगोला तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघांमध्ये दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून शेतकरी,शेतमजूर व पशुधनासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे.अशा परिस्थितीत,तालुक्यातील काही गावांमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सांगोला पाणीपुरवठा योजनेची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करुन तालुक्यातील सर्व गावांना पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी आमदार डॉ. देशमुख यांनी केली.सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेतून 82 गावांपैकी 51 गावांना पाणीपुरवठा होत आहे.मात्र, अद्याप काही गावांमध्ये योजनेची कामे प्रलंबित असल्याने तेथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उर्वरित गावांतील प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करुन सर्व गावांना योजनेचा लाभ मिळावा,असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.तसेच
सांगोला तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघांमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढत असून पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शेतकरी व पशुपालकांसमोर जनावरांचे संगोपन करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर,प्रशासनाने विलंब न करता संपूर्ण मतदारसंघांमध्ये चार चारा छावणी डेपो तातडीने सुरु करावेत. त्यासाठी आवश्यक नियोजन करुन पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध करुन द्यावा,अशी मागणी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे केली. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी चारा डेपो सुरु करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
=========================
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या मागण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद :
सांगोला तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती,पाणीटंचाई आणि पशुधनाच्या चारा प्रश्नाबाबत आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी मांडलेल्या मागण्यांची जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी सकारात्मक दखल घेतली. तालुक्यातील उर्वरित गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रलंबित कामे तसेच चार चारा छावणी डेपो सुरु करण्याच्या मागणीबाबत प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली.
==============



