सांगोल्यात माणगंगा परिवार व पालवी ॲग्रीकोच्या डाळिंब निर्यात चर्चासत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद
जागतिक बाजारपेठेची दारे शेतकऱ्यांसाठी खुली

सांगोला :
सांगोला येथील माणगंगा परिवार व पालवी ॲग्रीको यांच्या संयुक्त विद्यमाने डाळिंब आणि जागतिक बाजारपेठ या विषयावर आयोजित चर्चासत्राला APEDA चे माजी सल्लागार व निर्यात क्षेत्रातील २५ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या शरद नानापुरे सर यांनी कृषिमाल निर्यात व जागतिक बाजारपेठेतील संधींबाबत केलेल्या सविस्तर मार्गदर्शनामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
माणगंगा परिवार व पालवी ॲग्रीको यांच्या संयुक्त विद्यमाने डाळिंब आणि जागतिक बाजारपेठ या विषयावर सांगोला येथे आयोजित या चर्चासत्राच्या कार्यक्रमास बळीराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सुरुवात करण्यात आली आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन चर्चासत्रास प्रारंभ झाला.चर्चासत्राचे प्रास्ताविक माणगंगा परिवाराचे संस्थापक-अध्यक्ष, पालवी ॲग्रीकोचे चेअरमन तथा सांगोला नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांनी केले.
सदर प्रास्ताविकात,उपनगराध्यक्ष नितीन इंगोले
यांनी आपल्या भागातील शेतकरी दर्जेदार कृषिमालाचे उत्पादन घेत असून,या उत्पादनाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करुन देणे व शेतमालाला योग्य बाजार भाव मिळवून देणे,ही काळाची गरज असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी केवळ स्थानिक बाजारपेठेपुरते मर्यादित न राहता,जागतिक बाजारपेठेतही आपला ठसा उमटवावा,या उद्देशाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डाळिंबासह इतर पिकांच्या निर्यातीसाठी शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्याचा माणगंगा परिवाराचा व पालवी ॲग्रीकोचा प्रयत्न असल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले.
निर्यात प्रक्रिया व जागतिक बाजारपेठेबाबत सविस्तर मार्गदर्शन :
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक शरद नानापुरे सर यांनी डाळिंबासह इतर कृषि मालासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या संधींची माहिती दिली.परदेशातील ग्राहक कसे शोधावेत ?,निर्यातीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात ?,निर्यात प्रक्रिया कशी पूर्ण करावी ? आणि जागतिक बाजारपेठेतील ग्राहकांच्या गरजांनुसार शेतमालाची विक्री कशी करावी ?, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
भारतामधून युरोपमध्ये कृषिमालाची निर्यात करताना आवश्यक असणाऱ्या प्रक्रिया, गुणवत्ता निकष व कागदपत्रांची पूर्तता याविषयीही त्यांनी माहिती दिली. शेतकऱ्यांनी निर्यातक्षम गुणवत्तेचा शेतमाल तयार करुन जागतिक बाजारपेठेतील संधींचा लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी निर्यातीसंदर्भात विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.या चर्चासत्रामुळे शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याच्या प्रक्रियेची माहिती मिळाली.
या कार्यक्रमास माणगंगा परिवाराच्या चेअरमन सौ. अर्चनाताई इंगोले,संस्थेचे संचालक विवेक घाडगे सर, सचिन इंगोले,सौ.रोहिणी इंगोले,महादेव शिंदे,पोपट केदार साहेब,तोडकरी साहेब यांच्यासह माणगंगा परिवाराचा सर्व स्टाफ तसेच पालवी ॲग्री कोचा स्टाफ व इतर मान्यवर उपस्थित होते.या चर्चासत्रासाठी महाराष्ट्रातील विविध भागांतून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी माणगंगा परिवार व पालवी ॲग्रीको कटिबद्ध
या चर्चासत्राचा शेतकऱ्यांना भविष्यात निश्चितच फायदा होईल,असा विश्वास माणगंगा परिवाराचे व पालवी ॲग्रीकोचे संस्थापक अध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी व्यक्त केला.शेतकऱ्यांना आधुनिक शेती,कृषिमालाची विक्री,निर्यात आणि जागतिक बाजारपेठेतील संधी याबाबत मार्गदर्शन मिळावे, तसेच त्यांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळावी,यासाठी माणगंगा परिवाराच्या वतीने भविष्यातही शेतकरी व शेतीच्या विकासासाठी आवश्यक विविध उपक्रम व योजना राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांना
आर्थिक सेवांसोबतच कृषी क्षेत्रातील नव्या संधींची माहिती, बाजारपेठेचे मार्गदर्शन आणि प्रगतीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे चर्चासत्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरले.
=========================
शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य व विविध वस्तूंचे वाटप :
कार्यक्रमाच्या निमित्ताने माणगंगा ॲग्रो मार्ट व पालवी ॲग्रीकोच्या वतीने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेती उपयोगी साहित्य व विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये ट्रॅक्टर,शाईन मोटारसायकली,इलेक्ट्रिक स्कूटर,एलईडी टीव्ही,फ्रिज, कुलर,वॉशिंग मशीन,फवारणी पंप,ताडपत्री यांसह विविध वस्तूंचा समावेश होता.या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
=========================



