ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव आजपासून सुरु
सांगोला :
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा १०९ वा पुण्यतिथी महोत्सव ध्यानमंदिर,सांगोला व श्रीराम मंदिर,सांगोला येथे संपन्न होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भिक्षा, भजन, मौन, गायन, कीर्तन, प्रवचन, उपासना इत्यादी कार्यक्रम होणार आहेत.
शुक्रवार दि.९ डिसेंबर रोजी या उत्सवास प्रारंभ होत असून दररोज सकाळी ६ वाजता मंगलधून व काकडा तर ६.३० वा.सामुदायिक जप व उपासना श्रीराम मंदिरात होईल. दुपारी ४ ते ५ या वेळेत श्रीराम मंदिरात महिला भजनी मंडळाची भजने होतील.तसेच शुक्रवारी श्रमिका कुलकर्णी सांगोला हिचे नारदिय कीर्तन होणार आहे. रविवारी ११ डिसेंबर रोजी “भजन संध्या” हा कार्यक्रम होत असून दयानंद बनकर, भडंगे गुरुजी, समाधान ढेकळे, सुधाकर कुंभार व साथीदार यांचा या कार्यक्रमात सहभाग असणार आहे. सोमवार दि. १२ डिसेंबर रोजी ह.भ.प.श्री.जयवंत बोधले महाराज पंढरपूर यांचे प्रवचन होणार असून मंगळवारी १३ डिसेंबर रोजी ह.भ.प.श्री.संदीप बुवा मांडके पुणे यांचे नारदिय कीर्तन होणार आहे.
बुधवारी १४ डिसेंबर रोजी ह.भ.प.रामनाथ बुवा अय्यर, पुणे यांचे नारदिय कीर्तन त्याचबरोबर शुक्रवारी १६ डिसेंबर रोजी अंजली बर्वे यांचे प्रवचन होणार आहे. कीर्तन व प्रवचन हे सर्व कार्यक्रम ध्यान मंदिर (वाढेगाव रोड,सांगोला) या ठिकाणी सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत होतील.
रविवारी १८ डिसेंबर रोजी श्रीराम मंदिरात पहाटे ५ ते ६.३० या वेळेत श्रीमती शुभांगी कवठेकर यांचे पुण्यतिथीचे कीर्तन व श्री महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी होईल. त्यानंतर, महाराजांची पालखी व नगरप्रदक्षिणा शोभायात्रा होईल.
या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा,असे आवाहन नाम साधना मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.