आरोग्य

जवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कुलूपबंद अवस्थेत : नागरिकांची गैरसोय

 

सांगोला :

                शासनाचा गलेलठ्ठ पगार घेऊनही गांवोगांवी असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात आरोग्य अधिकारी व आरोग्य सेवक हे कधीच फिरकत नसल्याचे भीषण वास्तव समोर येऊ लागले असून सांगोला तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या सर्वात संवेदनशील गांव असलेल्या जवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही आरोग्य अधिकारी किंवा साधा कर्मचारीही उपस्थित राहत नसल्याने कोट्यावधी रुपये खर्च करुन उभा केलेले हे  आरोग्य केंद्र अधिकारी व कर्मचारी अभावी बंद ठेवावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवार दि.१० डिसेंबर रोजी उघडकीस आला.

जवळा या गावाच्या आसपास असलेल्या वाड्यावस्त्या व छोट्या मोठ्या खेड्यातील अनेक रुग्ण वैद्यकीय सेवेसाठी जवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व जवळ असलेल्या उपकेंद्रावर अवलंबून आहेत. किरकोळ दुखापत झाल्यानंतर, अपघातानंतर तसेच अन्य उपचारासाठी नागरिकांना शासकीय आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राचा आधार घ्यावा लागतो. सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उभा केलेल्या जवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येथील वैद्यकीय अधिकारी हे कधीच फिरकतच नसल्याने हे आरोग्य केंद्र चक्क दिवसाढवळ्याही कुलूप बंद अवस्थेत ठेवावे लागत आहे. शनिवारी १० डिसेंबर रोजी जवळा व परिसरातील तब्बल २० ते २५ पुरुष आणि महिला रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी या आरोग्य केंद्रात आले असता, त्यांना कुलूप बंद अवस्थेत असलेले आरोग्य केंद्र पहायला मिळाले. यापूर्वीही,वारंवार या आरोग्य केंद्रात एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने बहुतांशी हे आरोग्य केंद्र बंदच असल्याचे येथील नागरिक सांगतात.

दरम्यान शनिवारी, वैद्यकीय उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या २० ते २५ गरजू रुग्णांना, आरोग्य केंद्रात एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळून आल्याने त्यांनी तात्काळ येथील सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायतीशी संपर्क साधून त्यांना सदरचा प्रकार सांगितला. यानंतर सरपंच, उपसरपंच तसेच सर्व ग्रा.पं. सदस्यांनी तात्काळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, त्यांनाही जवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कुलुपबंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे, उपचारासाठी आलेले २० ते २५ रुग्ण आणि सरपंच व उपसरपंचासह गांवातील नागरिक तब्बल दीड ते दोन तास आरोग्य केंद्रात ठिय्या मांडून होते. परंतु यादरम्यान, एकही अधिकारी किंवा कर्मचारी इकडे फिरकला नसल्याने आरोग्य यंत्रणेच्या या गलथान कारभाराबाबत रुग्ण आणि नागरिकात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

जवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी हे वारंवार गैरहजर रहात असल्याची येथील रुग्णांची सातत्याने तक्रार आहे. याबाबत ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंचासह अनेक सदस्य तसेच नागरिकांनी वारंवार संबंधित अधिकारी व कर्मचारी तसेच वरिष्ठांकडे तोंडी स्वरूपात तक्रार केली आहे.मात्र निर्ढावलेल्या वैद्यकीय यंत्रणेला अद्याप जाग आलेली दिसून येत नाही,हे विशेष.
————————————————————————

अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई न झाल्यास वेगळा विचार करावा लागेल :

          प्राथमिक आरोग्य केंद्रात कायम आरोग्य सेवेचा दुष्काळच असून जिल्हा शल्य चिकित्सक,वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सातत्याने तक्रारी करुनही आरोग्य केंद्रात कोणतीही सुधारणा होत नाही. तसेच कामचुकार अधिकारी व कर्मचारी यांच्यावरही कोणतीच कारवाई होत नाही. शनिवारी दुपारी तब्बल २० ते २५ रुग्ण उपचारासाठी आरोग्य केंद्रात आले असता,एकही अधिकारी किंवा कर्मचारी येथे उपस्थित नव्हता आणि याबाबत नागरिक नेहमीच तक्रारी करतात.त्यामुळे, अशा अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल.
                   – दत्तात्रय बर्वे (माजी सरपंच,जवळा)
———————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button