सांगोला :
सांगोला विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा प्रचंड संच असूनही युती व आघाडीचा धर्म पाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्यासारख्या गुणी नेत्यावर पक्षाकडून सातत्याने अन्याय झाला. तरी देखील दिपकआबा यांनी कधीच व कसलीही तक्रार न करता, प्रामाणिकपणे पक्षवाढीचे काम केले. मात्र, यापुढील काळात दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्यावर होत असलेला राजकिय अन्याय आम्ही यापुढे सहन करणार नाही,असा जणू निर्धारच रविवारी सांगोला येथे ११ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंथन शिबिरात सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला.
या शिबिरास स्व.आर.आर.पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील,पक्षाचे निरीक्षक सुरेश घुले, जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा जयमालाताई गायकवाड,लतिफ तांबोळी,उद्योग व्यवसाय सेलचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.खा.शरदचंद्र पवार यांचे विचार तळागाळात पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “मंथन शिबिर- वेध भविष्याचा” या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिबिरात आगामी काळात देशाचे नेते खा.शरदचंद्र पवार यांच्या नजरेतील महाराष्ट्र साकारणार असल्याचा एकमुखी निर्धार या शिबिरातून करण्यात आला. दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मान्यवरांनी शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले.
शिर्डी,जि.अहमदनगर येथील पक्षाच्या शिबिरानंतर प्रत्येक मतदार संघात पक्षाचे “मंथन-वेध भविष्याचा” हे शिबिर आयोजित करण्यात आले असून रविवारी सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात मार्गदर्शन करतांना पक्षाचे जेष्ठ नेते बळीरामकाका साठे म्हणाले की,सांगोला विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहे. दिपकआबा आणि जयमालाताई गायकवाड या बहीणभावांनी सत्ता असो किंवा नसो, तालुक्यात असणारी ताकद कायम ठेवली आहे. पक्षाने जिल्ह्यात आजवर आयोजित केलेल्या सर्व शिबिरात सांगोला येथील शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आता जेंव्हा आपण पवार साहेबांची भेट घेऊ, तेंव्हा सर्वात प्रथम अनेक वर्षांपासून उपेक्षित असणाऱ्या दिपकआबांना न्याय देण्याची विनंती करणार असून आबांची सांगोला तालुक्यातील राजकीय ताकद, त्यांचा अनुभव आणि काम करण्याची तळमळ पाहता,अशा सच्चा कार्यकर्त्याला न्याय देण्याची विनंती प्राधान्याने नेतृत्वाकडे आपण करु,असेही शेवटी बळीरामकाका म्हणाले. यावेळी बोलताना पक्षाचे निरीक्षक सुरेश घुले म्हणाले की, आगामी काळात येणाऱ्या नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बूथ यंत्रणा सक्षमीकरणावर भर द्यावा. तसेच सध्या केंद्र आणि राज्य सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरु असल्याचा घणाघातही त्यांनी केला. सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर, संपूर्ण राज्यात पक्षाचे काम अत्यंत निष्ठेने आणि विश्वासाने करणाऱ्या दिपकआबा यांना यापुढील काळात न्याय मिळवून देण्यासाठी आपण तत्पर राहू,असेही यावेळी त्यांनी आवर्जून नमूद केले.
यावेळी नागेश फाटे,लतिफ तांबोळी, जयमालाताई गायकवाड,डॉ.पियुष साळुंखे-पाटील,तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे,शिवाजी कोळेकर,संभाजी हरिहर,प्रसाद लोखंडे, जयश्री सावंत,अश्विनी माने, नवनाथ मोरे यांनी आपले विचार व्यक्त केले.सदर शिबिरास जेष्ठ नेते बाबुराव गायकवाड,तानाजीकाका पाटील,युवक तालुकाध्यक्ष अनिलनाना खटकाळे,माजी सभापती अनिल मोटे,माजी नगरसेवक शिवानाना बनकर, शिवाजी बंडगर,महिला अध्यक्षा सखुबाई वाघमारे,महिला शहराध्यक्षा शुभांगी पाटील,अमोल सुरवसे,सुयश बिनवडे,रवी चौगुले,शोएब इनामदार आदींसह सांगोला शहर,तालुक्यातील सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
————————————————————————
* सामान्य लोकांचा विश्वास हेच आपले भांडवल :
स्व.आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील स्व.शारदादेवी साळुंखे-पाटील यांची जनसेवेची परंपरा आहे.सत्ता, पद असो किंवा नसो, सामान्य लोकांची सेवा करणे,हे आपल्या रक्तात आहे. आजपर्यंत कधीच मनात कोणताही स्वार्थ न ठेवता प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले आहे. सत्ता असो किंवा नसो,येथील सामान्य नागरिक आणि कार्यकर्ते नेहमी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले आहेत. सामान्य लोकांचा माझ्यावर आणि साळुंखे-पाटील परिवारावर असलेला विश्वास हेच आपले राजकीय भांडवल असून शेवटच्या श्वासापर्यंत सामान्य लोकांचा आपल्यावर असलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी त्यांची सेवा करेन.
– दिपकआबा साळुंखे-पाटील
————————————————————————
*दिपकआबांसारखे नेतृत्व पुढे येणे ही काळाची गरज :
स्व.आर.आर.आबा पाटील आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे- पाटील यांचे सख्ख्या भावासारखे सबंध होते. त्यामुळे कुटुंबातील एक वडीलधारी म्हणूनच मी आबांकडे पाहतो. मी आबांची काम करण्याची पद्धत लहानपणापासून पाहतोय. कवठे महांकाळ तालुक्याशी सांगोला तालुक्यातील अनेक गावांतील लोकांचे अगदी जवळचे संबंध आहेत. सत्ता असो किंवा नसो,सतत लोकांचे काम करणारा आबांसारखा नेता मी पहिला नाही. त्यांनी कधीच जात,धर्म किंवा पक्षभेद मानला नाही. मोठ्या मनाने जो माणूस पुढे येईल,त्याचे प्राधान्याने काम करणे, हीच त्यांची संस्कृती आहे. मला कवठे महांकाळपेक्षा सांगोला तालुक्यात जास्त लक्ष द्यावे लागले किंवा कष्ट घ्यावे लागले तरी, माझी तयारी आहे. मात्र,दिपकआबा यांचेसारखे सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व पुढे येणे हीच खरी काळाची गरज आहे.
– रोहित (आर.आर.)पाटील
(युवा नेते – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
—————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक