बाबासाहेबांची चाललीयं मुस्कटदाबी, दीपकआबांना केलयं कठपुतळी तर, शहाजीबापू म्हणतात,”चीत भी मेरी और पट भी मेरी”
सांगोला/हमीदभाई इनामदार :
सांगोला विधानसभा मतदार संघातून तब्बल 11 वेळा निवडून येऊन विश्वविक्रम करणारे शेकापचे जेष्ठ नेते स्व.गणपतराव देशमुख यांच्या काळात सांगोला तालुक्याचे राजकारण हे पुरोगामी विचाराने,निष्ठेने व विश्वासाच्या बळावर चालणारे सरळमार्गी राजकारण होते. परंतु, स्व.आबासाहेबांच्या निधनानंतर राजकारणाची दिशाच बदलली असून नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका तसेच जि.प.व पं.स.या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान तर,जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. जयकुमार गोरे यांनी साम,दाम,दंडाचे हाथखंडे वापरुन स्वतः हस्तक्षेप करत केलेल्या विचित्र आघाड्या व युत्यांच्या राजकारणाला तालुक्यातील दिग्गज व धुरंदर नेतेमंडळींही बळी पडल्याचे पाहून,अशा दिवसागणिक बदलणाऱ्या छक्क्यापंजाच्या राजकारणाची सवय नसलेला सर्वसामान्य मतदार मात्र, बुचकळ्यात पडला आणि पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे सांगोल्याच्या राजकारणाचा पार बट्ट्याबोळ झालायं,असे आपसूकच जाहीरपणे बोलू लागला.
पूर्वीपासून सांगोला तालुक्याच्या राजकारणात स्व.गणपतराव देशमुख,शहाजीबापू पाटील व दीपकआबा साळुंखे-पाटील या तिघांना मानणारा वेगवेगळा गट असून तालुक्यातील जनतेवर या तिघांच्या गटाचीच छाप होती.या तिघांव्यतिरिक्त तालुक्याच्या राजकारणात कुणी चौथा नेता तयार झाला नाही व या तिघांनी मिळून कुणाला होऊही दिला नाही आणि तालुक्याबाहेरील नेत्याला तर,कधी येऊही दिले नाही.परंतु,स्व.आबासाहेबांच्या निधनानंतर दोन-चार वर्षाच्या काळातच तालुक्याच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरे घडू लागली.विशेषतः भाजपचे तत्कालीन खासदार व तत्कालीन आमदार यांनी सांगोल्यात लक्ष घालून शेकाप मधीलच कांही महत्वाकांक्षी ठेकेदारांना मोठ्या कामाचे लालूच दाखवून त्यांच्या माध्यमातून आपल्या पक्षाकडून तालुक्यातील कांही नेतेमंडळींना आमदारकीच्या निवडणुकीत लागणारी रसद पुरवून त्यांना मिंध्यात करुन घेतल्याने ‘त्या’ स्थानिक नेत्यांना आता त्याची जबरदस्त राजकीय किंमत मोजावी लागत आहे.
आमदारकीच्या निवडणुकीनंतर सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी,तत्कालीन आमदार व विद्यमान पालकमंत्र्यांनी शेकापमधीलच ‘त्या’ महत्वाकांक्षी ठेकेदारासह एका गटाचा भाजप प्रवेश घडवून आणला आणि येथूनच खरं पालकमंत्र्यांनी सांगोल्याच्या राजकारणावर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली. भाजपात प्रवेश केलेल्या त्या ठेकेदाराच्या माध्यमातून
ऐन नगरपालिकेच्या निवडणुकी दरम्यान,नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबरोबरच शेकापचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख व दीपकआबा गटाबरोबर भाजपची आघाडी करण्यात यशस्वी झालेल्या पालकमंत्र्यांच्या अजब खेळीमुळे शेकाप व दीपकआबा गटाची नाचक्की होऊन त्यांना पराभवाचा चांगलाच झटका बसला असला तरी,सांगोला नगरपालिकेच्या संपूर्ण इतिहासात भाजपचा कधी एकही नगरसेवक निवडून आला नसताना,शेकाप व दीपकआबा गटाच्या मदतीने आपले उखळ पांढरे करुन घेत भाजपने कधी नाही ते पहिल्यांदाच तब्बल 4 नगरसेवक निवडून आणले व सांगोल्याच्या राजकारणात भाजपचा चंचुप्रवेश झाला. 1985 साली भाजपचे फक्त 2 खासदार निवडून आल्याने देशाच्या राजकारणातही त्यावेळी भाजपने चंचुप्रवेश केला होता आणि आज देशाची सर्व सत्ताकेंद्रे भाजपच्या हाती आहेत.अगदी त्याच धर्तीवर भविष्यात कशावरुन सांगोल्याची सर्व सत्ताकेंद्रे भाजपच्या हाती नसतील ?
नगरपालिकेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भाजपसह पालकमंत्र्यांचीही अपेक्षा वाढल्याने जि.प.व पं.स.ची निवडणूकही लढवण्यासाठी भाजप तयारीला लागला.पण,यावेळी या निवडणुकीत शेकाप व दीपकआबा गटाशी युती न करता,महायुतीचे घटक पक्ष असलेल्या माजी आमदार शहाजीबापूंच्या शिवसेनेशी व अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीशी युती करुन भाजपाने 1 जि.प.सदस्य व 1 पं.स.सदस्य निवडून आणला.विशेष बाब ही की, भाजपचा फक्त एकच पं.स.सदस्य असताना ऐन सभापती पदाच्या निवडीच्या तोंडावर पालकमंत्र्यांनी दीपकआबांना हाताशी धरुन (दीपकआबांना अजूनही प्रवेश दिला नाही तरी,) त्यांच्या गटाच्या तिन्ही पं.स.सदस्यांना भाजपात प्रवेश देऊन भाजपचे एकाचे चार सदस्य केले आणि शहाजीबापूंच्या शिवसेनेचे 4 सदस्य सोबत घेऊन सांगोल्यात पहिल्यांदाच चक्क भाजपचा सभापती बनविण्याची किमया पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी करुन दाखवली.
आता,जि.प.व पं.स.च्या निवडणूकीत दीपकआबांची शेकापबरोबर आघाडी होती आणि या आघाडीला पंचायत समितीच्या 14 पैकी 9 जागा (शेकाप-6 तर,दीपकआबा गटाला-3 जागा) मिळाल्याने पंचायत समितीवर आघाडीची सत्ता आलेली असतानाही ऐनवेळी दीपकआबांनी पालकमंत्र्यांशी हातमिळवणी का केली ? आणि भाजपाचा सभापती कसा झाला ? हे सर्वश्रुत आहे.परंतु,एवढे मात्र खरे की,मागील 5-6 महिन्यांच्या कालावधीतच पालकमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे स्थानिक नेतेमंडळींनीही इकडून तिकडे मारलेल्या कोलांटउड्यामुळे सांगोल्याच्या राजकारणाचा पार बट्ट्याबोळ झालायं,हे कोणीही नाकारु शकत नाही.
==========================
बाबासाहेबांची चाललीयं मुस्कटदाबी : आमदारकी मिळाली पण,सत्ताकेंद्रे गेली :
सांगोल्याच्या राजकारणात पालकमंत्री नाम.जयकुमार गोरे यांच्या एंट्रीने तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांची मात्र,मुस्कटदाबी चालली असून विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाने त्यांना केलेल्या सहकार्याची जाहीरपणे वाच्यता करुन पालकमंत्री जयकुमार गोरे हे त्यांची एकादृष्टीने मतदारसंघात मानहानीच करत आहेत आणि दुसरीकडे शेकाप मधीलच कांही असंतुष्ट पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन शेकापचे लचके तोडत आहेत.
नगरपालिकेच्या निवडणुकीत पुरोगामीत्वाच्या भूमिकेविरुद्ध शेकापला भाजपबरोबर युती करण्यास भाग पाडून एकीकडे,पालकमंत्र्यांनी डॉ.बाबासाहेब देशमुख यांना मतदारांच्या टीकेचे धनी केले तर दुसरीकडे,भाजपच्या नादी लागून शेकापला पराभवाला सामोरे जावे लागले.
शेकापला नगरपालिकेचा पराभव अजून विसरताही आला नाही तोपर्यंत,दीपकआबांच्या गटासोबत आघाडी करुन लढवलेल्या पंचायत समितीच्या निवडणूकीत 14 पैकी 9 जागा (शेकाप-6 तर,दीपकआबा गटाला-3 जागा) मिळाल्याने पंचायत समितीवर शेकाप आघाडीची सत्ता आलेली असतानाही ऐनवेळी दीपकआबांना हाताशी धरुन पालकमंत्र्यांनी भाजपचा सभापती निवडून आणून अनेक वर्षांपासून असलेली शेकापची सत्ता उलथवून डॉ.बाबासाहेब देशमुख यांना जबरदस्त धक्का दिला. एकंदरीत,सांगोल्याच्या राजकारणात पालकमंत्री नाम.गोरे यांच्या एंट्रीने आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांची चांगलीच मुस्कटदाबी चालली असून डॉ.बाबासाहेबांना आमदारकी मिळाली पण,तालुक्यातील महत्वाची सत्ताकेंद्रे ही भाजपमुळेच गमवावी लागली,हे तितकेच खरे.
==========================
भाजप प्रवेशाचे गाजर दाखवत दीपकआबांचा केला जातोयं कठपुतळीसारखा वापर ? :
माजी आमदार दीपकआबांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उबाठा सेनेकडून उमेदवारी घेऊन 2024 ची विधानसभा लढवली पण,त्यात अपयश आल्याने निवडणुकीनंतर सर्वच पदांचा राजीनामा देऊन भाजपमध्ये जाण्याचा मनोदय व्यक्त केला.पुन्हा सुदैवाने त्यांचे जवळचे सहकारी असलेले मंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले.त्यामुळे,आता आपला भाजप प्रवेश लवकरच होईल, अशी आशा बाळगत गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून दीपकआबा हे वाट पहात आहेत.पण,भाजप प्रवेशाचे गाजर दाखवत कधी नगरपालिका निवडणुकीत तर,कधी पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत
पालकमंत्र्यांकडून दीपकआबांचा कठपुतळीसारखा वापर केला जातोयं की काय ?,असेच वाटू लागले आहे.
नगरपालिका निवडणुकीत पालकमंत्र्यांनी शेकापसह दीपकआबा गटासोबत भाजपची युती करुन स्वतःचे 4 नगरसेवक निवडून आणले.पण,दीपकआबा यांचा मात्र एकच नगरसेवक निवडून आला.जि.प.व पं.स. च्या निवडणुकीत मात्र पालकमंत्र्यांनी दीपकआबांच्या विरोधात शहाजीबापू यांच्या शिवसेनेशी युती केल्यानंतर भाजपचा फक्त एकच पं.स.सदस्य निवडून आला असतानाही,पालकमंत्र्यांच्या शब्दाखातर दीपकआबांनी शेकाप आघाडीच्या माध्यमातून निवडून आलेल्या आपल्या तिन्ही पं.स.सदस्यांना भाजपवासी करुन भाजपचा सभापती करण्यात सिंहाचा वाटा उचलला.
सांगोला पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी दीपकआबांच्या तिन्ही पं.स.सदस्यांना भाजपात प्रवेश दिला पण,दीपकआबांना मात्र प्रवेशाविना तसेच ताटकळवत ठेवले आहे.याचाच अर्थ,भाजप प्रवेशाचे गाजर दाखवत पालकमंत्र्यांकडून दीपकआबांचा कठपुतळीसारखा वापर तर केला जात नाही ना ? अशी शंका दीपकआबा समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.
==========================
शहाजीबापूंच्या बाबतीत मात्र,”चीत भी मेरी,पट भी मेरी” :
मागील सांगोला विधानसभा निवडणुकीत नाम.जयकुमार गोरे यांच्या पडद्यामागील हस्तक्षेपामुळे माजी आमदार शहाजीबापूंचा पराभव झाला खरा पण,नंतर सांगोल्याच्या राजकारणात झालेल्या विद्यमान पालकमंत्री नाम. जयकुमार गोरे यांच्या एंट्रीने शहाजीबापूंना चांगले दिवस आलेत,असेच म्हणावे लागेल.कारण,नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी पालकमंत्र्यांनी शहाजीबापूंना वगळून भाजप,शेकाप व दीपकआबांना घेऊन केलेली अभद्र युती शहरातील मतदारांनी नाकारली आणि बापूंच्या शिवसेनेला भरभरुन मते देऊन नगराध्यक्षासह तब्बल 15 नगरसेवक निवडून देऊन नगरपालिकेची एकहाती सत्ता शहाजीबापूंना बहाल केली.त्यामुळे,पालकमंत्र्यांच्या सांगोल्याच्या राजकारणातील एंट्रीने शहाजीबापूंना अप्रत्यक्षरित्या फायदाच झाला.
तर,जि.प.व पं.स.निवडणुकीत मात्र,पालकमंत्र्यांनी शेकाप व दीपकआबांच्या विरोधात महायुतीची मोट बांधून भाजपसह बापूंची शिवसेना व अजितदादांच्या राष्ट्रवादीला घेऊन निवडणूक लढवली.यामध्ये,भाजपाबरोबर शहाजीबापूंनाही चांगलाच फायदा झाला.या निवडणुकीत शहाजीबापूंच्या शिवसेनेचे प्रथमच 2 जि.प.सदस्य व 4 पंचायत समिती सदस्य निवडून आले.एकंदरीत, पालकमंत्र्यांनी इतरांना घेऊन शहाजीबापूंच्या विरोधात निवडणूक लढवली तरी,बापूंना नगरपालिकेची एकहाती सत्ता मिळाली आणि शहाजीबापूंसोबत जि.प.व पं.स.
ची निवडणूक लढवली तरी,बापूंचे 2 जि.प.सदस्य व 4 पं.स.सदस्य निवडून आले.
आता तर,पालकमंत्र्यांनी दीपकआबांना हाताशी धरुन भाजपचे 4 सदस्य व बापूंचे 4 सदस्य अशी 8 ची मॅजिक संख्या गाठून शेकापच्या हातातोंडांशी आलेला घास हिसकावून शेकापची तब्बल 55 वर्षांची सत्ता संपुष्टात आणत चक्क पंचायत समितीच ताब्यात घेतली आणि भाजपचा सभापती खुर्चीवर बसवण्याची किमया केली. शहाजीबापूंच्या हाती मिनी मंत्रालय असलेल्या पंचायत समितीची सत्ता यापूर्वी कधीच आली नाही.पण, पालकमंत्र्यांच्या खेळीमुळे झालेल्या सत्ताबदलात आगामी काळात शहाजीबापूंच्या गटालाही सभापतीपद मिळणार असल्याने सांगोल्याच्या राजकारणात पालकमंत्र्यांच्या एंट्रीने शहाजीबापूंना चांगलेच दिवस आले असून एकीकडे, पालकमंत्र्यांच्या विरोधात राहूनही नगरपालिकेची एकहाती सत्ता मिळाली तर दुसरीकडे,पालकमंत्र्यांच्या सोबत राहून पंचायत समितीच्या सत्तेत वाटा मिळणार आहे.एकंदरीत, पालकमंत्र्यांच्या एंट्रीने आमदार डॉ.बाबासाहेबांची मुस्कटदाबी व दीपकआबांची कठपुतळी झाली असली तरी, शहाजीबापूंच्या चेहऱ्यावर मात्र,”चीत भी मेरी और पट भी मेरी” झाल्याचा आनंद दिसून येतोय.
==========================
जय-वीरुची जोडी पुन्हा एकत्र ? :
2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी माजी आमदार दीपकआबांनी शिंदेसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांना पाठींबा दिल्याने शहाजीबापू निवडून आले आणि 2019 ते 2024 या 5 वर्षात शहाजीबापू व दीपकआबा हे दोघे खांद्याला खांदा लावून काम करत असताना तालुक्यातील जनता त्यांना “जय-वीरु” ची जोडी म्हणून संबोधू लागली. पण, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दोघानीही एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकल्याने “जय-वीरु” ची ही जोडी फुटली होती.
आता पुन्हा,पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडीच्या अनुषंगाने शहाजीबापू व दीपकआबा हे एकत्र आल्याने “जय-वीरु” ची जोडी पुन्हा एक झाल्याची भावना दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली असली तरी, राजकारणाच्या लढाईत “जय-वीरु” ची ही जोडी भविष्यात कुठेपर्यंत टिकणार ? हे येणारा काळच ठरवेल,एवढे मात्र खरे. ===================================
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक