गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सांगोल्याचे नूतन सभापती व उपसभापती स्वीकारणार पदभार

शहाजीबापू व दीपकआबांच्या उपस्थितीत संपन्न होणार पदग्रहण सोहळा

सांगोला :

गेली ५५ वर्षे शेकापची सत्ता असलेल्या सांगोला पंचायत समितीवर यंदा भाजप-शिवसेना महायुतीने आपला झेंडा फडकवला असून भाजपच्या नूतन सभापती पूनम इंगवले व शिवसेनेचे उपसभापती अजय सरगर हे मराठी नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुरुवार दि.१९ मार्च रोजी दु.१ वा.आपला पदभार स्वीकारणार आहेत.

तब्बल ५५ वर्षे सांगोला पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्षाने आपली एकहाती सत्ता राखली होती.मात्र यंदा,प्रथमच सांगोल्याच्या राजकारणातील “जय-विरु” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी आमदार शहाजीबापू व दीपकआबांनी एकत्रित येऊन शेकापला धक्का देत पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा फडकवला.सभापती व उपसभापती दोन्ही महत्त्वाची पदे महायुतीकडे आल्याने सांगोला तालुक्यातील माजी आमदार शहाजीबापू आणि दीपकआबांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

          गुरुवारी होणाऱ्या या पदग्रहण सोहळ्याला सांगोला विधानसभेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील,महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील,भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार,भाजपचे नेते बाळासाहेब एरंडे,उद्योगपती भाऊसाहेब रुपनर,आर.पी. आयचे खंडू सातपुते आदीसह महायुतीचे पदाधिकारी आणि नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.तरी, नूतन सभापती व उपसभापती पदग्रहण सोहळ्यासाठी जि.प.सदस्य,सांगोला पं.स.चे सदस्य,जि.प.व पं.स.चे सर्व विजयी व पराभूत उमेदवार तसेच ग्रामपंचायतीचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच,सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थितीत रहावे,असे आवाहन शिवसेनेचे तालुका अध्यक्ष तथा जि.प.सदस्य दादासाहेब लवटे,मधुकर बनसोडे,भाजपचे तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर आणि दादा खरात यांनी केले.
===================================