नामसाधकाने आपल्या जीवनामध्ये श्री महाराजांना केंद्रस्थानी ठेवावे-धैर्यशीलभाऊ देशमुख

सांगोला :

जर आपण मनापासून नाम घेतले तर महाराज आपला प्रपंच सुखमय करतात,याची प्रचिती अनेक साधकांना येत असून कोणतीही अडचण न सांगता नाम घेतले पाहिजे.
नामसाधना मंडळातील सर्व नामसाधकांनी नाम साधनेत आपला जास्तीत जास्त वेळ घालवून आपले जीवन सार्थकी लावावे आणि नामसाधकाने श्री महाराजांना आपल्या जीवनामध्ये केंद्रस्थानी ठेवले पाहिजे,अशी अपेक्षा चैतन्य जप प्रकल्पाचे कार्याध्यक्ष धैर्यशीलभाऊ देशमुख यांनी व्यक्त केली.

सांगोला येथील ध्यान मंदिरात नामसाधना मंडळाच्या वतीने जप संकुलातील जपकार व नामसाधना मंडळातील नामसाधक यांच्यासाठी चैतन्य जप प्रकल्पाचे २०२६ या वर्षातील २ रे विभागीय शिबिर शनिवारी आयोजित केले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना धैर्यशील भाऊ देशमुख हे बोलत होते.अनेकांना महाराजांच्या भक्तीचा अनुभव आला असून या अनुभवाचे कथन त्यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनातून केले.

ते पुढे म्हणाले की,करकंब येथील चौंडेश्वरी मंदिरात गोंदवलेकर महाराजांचा जो फोटो आहे तो फोटो गुलालाने भरलेला आहे,असा दिसतो. तिथे महाराजांचा साक्षात्कार झाला आहे.म्हणजे महाराज आजही आपल्यामध्ये आहेत, याची प्रचिती तेथील भक्तांना आली असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. ‘श्रीराम जय राम,जय जय राम’ हा मंत्र वाल्मिकीने रामायण मध्ये प्रभुराम जन्माच्या अगोदर लिहिलेला होता.तेव्हापासून आजपर्यंत हे राम नाम चालत आले असून यापुढेही चालणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ध्यान मंदिरात झालेल्या शिबिरात पंढरपूर,करकंब,सांगोला व इचलकरंजी येथील नाम साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी नामसाधना मंडळ पुरुष व महिला साधकांनी विशेष परिश्रम घेतले.
===================================