सांगोला नगरपरिषदेच्या वतीने १० वी व १२ वीच्या मुलींना शिष्यवृत्ती वाटप

 

सांगोला :

महिला व बालक यांच्या विकास व सक्षमीकरणासाठी सांगोला नगरपरिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागा अंतर्गत दरवर्षी विविध योजना व कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यावर्षीही या समिती अंतर्गत १० वी व १२ वी च्या मुलींना नगरपरिषदेचे प्रशासक तथा तहसीलदार अभिजीत पाटील व नुतन मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्या हस्ते ही शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली.

महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील तरतुदीनुसार प्रत्येक ‘अ’ व ‘ब’ वर्ग नगरपरिषदांना महिला व बालकल्याण समिती स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ‘क’ वर्ग नगरपरिषदांना आवश्यकतेनुसार समिती स्थापन करता येईल,अशी तरतूद करण्यात आली आहे.त्यानुषंगाने राज्य शासनाद्वारे महिला व बालकल्याण कार्यक्रमासाठी नगरपालिकांनी त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेल्या वार्षिक उत्पन्नाच्या बांधील खर्च वजा जाता उर्वरित रकमेच्या ५% रक्कम राखून ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.महिलांना सर्वच क्षेत्रांत सक्षम करण्यासाठी सदर खर्च विविध योजना व कार्यक्रम करण्यासाठी मार्गदर्शक सूचना ही निर्गमित करण्यात आल्या आहेत.
सांगोला नगरपरिषदेच्या ५ विषय समित्या असून त्यापैकी एक समिती ही महिला व बाल कल्याण विकास समिती आहे. या समितीमार्फत दरवर्षी महिला व बालकांच्या विकासासाठी विविध योजना व कार्यक्रम राबविले जात असतात.

सांगोले नगरपरिषदेकडील महिला व बालकल्याण विकास समितीच्या या योजनेतुन प्रत्येक वर्षी १० वी व १२ वी च्या मुलींना शिष्यवृत्ती वाटप करण्यात येते. सालाबाद प्रमाणे, यावर्षी देखील सांगोला शहरातील एकूण ७ शाळा व महाविद्यालय यांचे मार्फत १० वी व १२ वीत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवण्याऱ्या मुलींची माहिती मागवण्यात आली होती. यातूनच शहरातील एकूण ४२ विद्यार्थिनींची या शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली असून शिष्यवृत्तीची रक्कम थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.यामध्ये प्रथम क्रमांकासाठी ५ हजार रुपये,द्वितीय साठी ३ हजार रुपये व तृतीयसाठी २ हजार रुपये असे, शिष्यवृत्तीचे स्वरुप असून सोमवारी २३ जानेवारी रोजी शिष्यवृत्तीचे एकूण १ लाख ३९ हजार रुपये वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रम हा नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडला.सदर शिष्यवृत्ती वाटपाचा हेतू हा मुलींच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे,हा असून यामुळे मुलींच्या शैक्षणिक सक्षमीकरणाकरिता हातभार लागणार आहे.तसेच मुलींना आर्थिक सहाय्य मिळाल्यास मुलींच्या उच्च शिक्षणासाठी देखील यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.

सदर शिष्यवृत्ती वाटप हे नगरपरिषदेचे प्रशासक तथा तहसीलदार अभिजित पाटील आणि मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक विजय कन्हेरे, सभा अधीक्षक श्रीम.तृप्ती रसाळ, सहा.प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे,श्रीम.प्रतिभा कोरे, सर्व विद्यार्थिनी आणि पालक उपस्थित होते.—————————————————————————

शैक्षणिक सबलीकरणासाठी ही शिष्यवृत्ती मुलींना उपयुक्त ठरेल :

सांगोले नगरपरिषदेमार्फत वाटप करण्यात येत असलेली ही शिष्यवृत्ती मुलींच्या शैक्षणिक सबलीकरणासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार असून नगरपरिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत अन्य कोणत्याही नावीन्यपूर्ण कल्पना व सुचना असल्यास नगरपरिषदेस कळवावे,त्याच्या अंमलबजावणी साठी सर्व आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील. – मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^