सांगोला उपसा सिंचन योजनेमुळे वंचित भागाचा कायापालट होणार – दिपकआबा

 

सांगोला :

गेल्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असलेली आणि शासनाने काळ्या यादीत टाकलेली “उजनी उपसा सिंचन” ही योजना आमदार शहाजीबापू पाटील यांचेसह मी स्वतः प्रयत्न करुन पुन्हा मार्गी लावली असल्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असणारा सांगोला तालुक्याच्या शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जवळपास मार्गी लागला असून आगामी काळात सांगोला उपसा सिंचन योजनेद्वारे मिळणाऱ्या २ टीएमसी पाण्यातून सांगोला तालुक्यातील लोटेवाडी, इटकी,कटफळ, बागलवाडी,सोनलवाडी,अचकदानी, लक्ष्मीनगर, जाधववाडी,नरळेवाडी व वाकी (शिवणे) या वंचित गांवांचा कायापालट होणार असल्याचा विश्वास माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी “आमदार आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत आयोजित गांवभेटी दरम्यान व्यक्त केला.

आजी-माजी आमदारांच्या उपस्थितीत सांगोला तालुक्यात सध्या “आमदार आपल्या दारी” हा शासकीय उपक्रम सुरु असून या उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी विवीध विभागाच्या अधिकारी वर्गासह सांगोला तालुक्यातील वाकी, एखतपूर,सोनलवाडी,बागलवाडी,लक्ष्मीनगर,अचकदानी,लोटेवाडी,खवासपूर,इटकी,कटफळ,शेरेवाडी या गांवांना शनिवारी २१ जानेवारी रोजी भेट दिली. या भेटी दरम्यान माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील हे बोलत होते.यासमयी, सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील,बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते उद्योगपती भाऊसाहेब रुपनर,तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे,तहसीलदार अभिजीत पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी,गटविकास अधिकारी आनंद लोकरे,तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, महावितरणचे उप अभियंता आनंद पवार आदींसह सर्वच विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, सांगोला तालुक्याने शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी गेली अनेक वर्षे संघर्ष केला आहे.तालुक्यातील शेतीला हक्काचे पाणी मिळवून देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न आणि जीवनमान उंचविण्यासाठी सध्या माजी आमदार दिपकआबा साळुंखे- पाटील यांना सोबत घेऊन आपली लढाई सुरु असून २० वर्षांपासून बंद पडलेली उजनी उपसा सिंचन योजना पुनर्जीवित केली आहे. योजना मंजूर करुन थांबणार नाही तर, येत्या मार्च महिन्यापूर्वी या योजनेचे काम सुरु करुन आगामी वर्षभरात या योजनेचे पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे अभिवचनही यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिले. दरम्यान “आमदार आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत दुसऱ्या दिवशीही आम. शहाजीबापू पाटील आणि माजी आम.दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या कार्यकर्त्यांत जोश दिसून आला. गांवोगांवी दोन्हीं नेत्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
———————————————————————

नागरिकांकडून आजी माजी आमदारांचे आभार :

सांगोला तालुक्यातील सिंचन योजनांपासून वंचित असलेल्या लोटेवाडी,इटकी,कटफळ,बागलवाडी, सोनलवाडी,अचकदानी,लक्ष्मीनगर,जाधववाडी,नरळेवाडी व वाकी (शि)या गांवांसाठी उपयुक्त ठरणारी पण, बंद पडलेली योजना पुन्हा सुरु करुन कार्यवाही गतिशील केल्याबद्दल या गांवातील नागरिकांनी आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांचे आभार मानले. तसेच लोटेवाडी येथील ग्रामस्थांकडून आजी-माजी आमदारांचा सत्कारही करण्यात आला.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आम्ही विकासकामाचे राजकारण करतो, विकासकामात राजकारण करत नाही :

सांगोला तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असताना संपूर्ण सांगोला तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असतो. त्यामुळे आम्ही तालुक्याच्या विकासकामाचे राजकारण करतो, विकासकामात कधीच राजकारण करत नाही. दिपकआबा आणि माझ्या घराचे आणि कार्यालयाचे दरवाजे सामान्य जनतेसाठी नेहमीच खुले आहेत. आमची बांधिलकी जनतेशी आहे. तालुक्याच्या विकासासाठी आम्ही दोघेही वचनबद्ध आहोत.                                                                          – आमदार शहाजीबापू पाटील

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^