मंगळवारी सकाळी एकाचवेळी सुरु होणार,सोलापूर व माढ्याची मतमोजणी
सांगोला :
संपूर्ण देशभरासह माढा व सोलापूर लोकसभा मतदार संघातील मतदानाची मतमोजणी मंगळवारी ४ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार असून त्यासाठी प्रशासनाकडून मतमोजणीच्या नियोजनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही एकाचवेळी सोलापूर शहरातील रामवाडी गोदाम परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभानिहाय १४ टेबलवरुन २४ फेऱ्यांद्वारे ही मतमोजणी केली जाणार असून दुपारी १ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येईल.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघात १२ लाख १ हजार ५८६ तर,माढा लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदार संघात १२ लाख ६७ हजार ५३० जणांनी ७ मे रोजी मतदानाचा हक्क बजावला आहे.मतदानानंतर दोन्ही मतदारसंघातील सील केलेल्या ईव्हीएम मशीन या रामवाडी गोदामात स्ट्रॉंगरुममध्ये कडक बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत.ईव्हीएमसाठी पोलिसांचा खडा पहारा असून त्यावर सीसीटीव्हीचीही नजर आहे.
सोलापुरात काँग्रेसच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे व भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात तर,माढ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील व भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात लढत होत आहे.यापैकी,कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार ? आणि कोण बाजी मारणार ? याबाबत अनेकांनी पैजा लावल्या आहेत.
———————————————————
मतमोजणी होईल २३ ते २४ फेर्यांत पूर्ण :
सोलापूर मतदारसंघात १ हजार ९६८ तर माढा मतदार संघात २ हजार ३० मतदान केंद्रे होती.प्रत्येक विधानसभा क्षेत्राची १४ टेबलवर मोजणी करण्यात येणार असल्याने,एका फेरीत ८४ केंद्रांची मोजणी होईल.त्यानुसार सुमारे २३ ते २४ फेर्यांत मतमोजणी पूर्ण होईल. प्रत्येक फेरीची आकडेवारी त्या-त्या वेळी स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.प्रारंभी,पोस्टल मते मोजली जाणार असून यात ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग,सैनिक व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या मतदानाचा समावेश आहे.
———————————————————
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार सोलापूरची मतमोजणी :
सोलापूरची मतमोजणी ही जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली तर,माढ्याची मतमोजणी ही अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.
——————————————————————————