धक्कादायक : विद्यार्थिनीने लग्नास नकार दिल्याने विद्यार्थ्याने पेटवून घेवून तिलाही पेटविण्याचा केला प्रयत्न

 

औरंगाबाद :

                औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शासकीय विज्ञान संस्थेत संशोधन करणाऱ्या एका विद्यार्थिनीने लग्नास नकार दिल्याने विद्यार्थ्याने प्रेम प्रकरणातून स्वत:ला पेटवून घेवून तिच्यावरही पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडल्याने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की, गजानन मुंडे या विद्यार्थ्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शासकीय विज्ञान संस्थेत संशोधन करणाऱ्या पूजा साळवे या विद्यार्थिनीवर प्रेम होते.परंतु, या विद्यार्थिनीने लग्नास नकार दिल्याने गजानन मुंडे हा नाराज होता. सोमवारी दुपारी ही विद्यार्थिनी प्रयोगशाळेत असताना मुंडे हा दुचाकीवर तेथे आला.      सदर तरुणी ही प्रयोगशाळेत तिच्या मार्गदर्शक महिला प्राध्यापकांशी संवाद साधत असताना, मुंडे याने सोबत आणलेले पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतल्यामुळे भीतीने ती मुलगी व प्राध्यापक दोघीही बाहेर पळत आल्या.नंतर त्याने ते पेट्रोल पूजा साळवेच्या अंगावरही टाकले व तिला पेटवण्याचा प्रयत्न केला,त्यात तिचा चेहरा जळाला असून मुंडे हाही चांगलाच भाजला आहे. भाजलेल्या अवस्थेत असलेल्या दोघांवरही घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पूजा साळवे हिने लग्नास नकार दिला,या कारणावरुन गजानन मुंडे याने तिच्यासह स्वतःला आग लावून घेतल्याची माहिती बेगमपुरा पोलिसांनी दिली असून मुलीचा जबाब नोंदवण्यात आला आहे.हे दोन्हीही विद्यार्थी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधन करत असून सदर मुलगी ही बायो फिजिक्स अभ्यासक्रमाची विज्ञान संस्थेतील माजी विद्यार्थिनी आहे. या घटनेमुळे विद्यापीठ आणि शासकीय विज्ञान संस्थेत खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
—————————————————————————