चंद्रकांतदादा देशमुख यांची महानंदाच्या संचालकपदी पुन:श्च निवड

 

मुबंई :

शेकापचे नेते चंद्रकांतदादा देशमुख यांची महाराष्ट्र राज्य सहकारी दूध (महानंदा) महासंघाच्या संचालकपदी पुन:श्च बिनविरोध निवड झाली असून या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था असलेल्या “महानंदा” या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या संचालक पदावर राज्यातील दूध व सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमत्वाची निवड केली जाते. यंदा झालेल्या निवडणूकीत भाजप,शिवसेना,कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या सर्वच पक्षातील विविध नेतेमंडळी स्पर्धेत होती. अशा दिग्गज नेतेमंडळींच्या स्पर्धेतूनही माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच राज्यातील इतर नेत्यांनी दूरदृष्टी ठेवून चंद्रकांतदादांची सलग दुसर्‍यांदा बिनविरोध निवड केली.

चंद्रकांतदादा देशमुख यांनी आपल्या मागील संचालकपदाच्या काळात,दूग्ध व्यवसायात दूधवाढ योजना, मॉर्डन डेअरी फार्म,गाय पोळा, गायींसाठी आरोग्य शिबिरे, चारा व्यवस्थापन व स्वच्छता असे विविध उपक्रम राबवून विविध उप पदार्थांचे दर्जेदार उत्पादन व विक्री यातून संघाचा लौकीक वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे,ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली असून शेतकऱ्यांना विश्‍वासाचा जोड धंदा मिळाला आहे. चंद्रकांतदादा देशमुख यांची महानंदा संस्थेच्या संचालकपदी पुन्हा एकदा निवड झाल्याने सोलापूर जिल्ह्यासह सांगोला तालुक्‍यातील विवीध पक्षाचे नेतेमंडळी, पदाधिकार्‍यांकडून या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
—————————————————————————