वकिलांनी मूल्यांची शिदोरी घेऊन व स्वत:वर विश्वास ठेवून मार्गक्रमण करावे,अडथळे पार होतील – सरन्यायाधीश उदय लळित
सोलापूर :
तरुण नवोदित वकिलांनी पॅशन म्हणून वकिली करावी.या व्यवसायात सुरुवातीला अनंत अडथळे येतील, ठेचाही लागतील, तरीदेखील या अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरु नका, पुढे चालत रहा, वकिलांनी मूल्यांची शिदोरी घेऊन व स्वत:वर विश्वास ठेवून मार्गक्रमण करावे,सर्व अडथळे निश्चीतच पार होतील,असे प्रतिपादन भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळित यांनी रविवारी सोलापूरात केले.
महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या वतीने सोलापूरमधील हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित राज्यस्तरीय वकील परिषदेत सरन्यायाधीश उदय लळित हे बोलत होते. सोलापूरचे सुपूत्र असलेले न्या.उदय लळित यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्याने सोलापूरकरांच्या वतीने मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकूर दत्ता,सोलापूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ.शब्बीर अहमद औटी, सोलापूरचे रहिवासी असलेले न्यायाधीश एम. एस.कर्णिक, एन.जे.जमादार,विनय जोशी,राज्याचे महाधिवक्ता ॲड. आशुतोष कुंभकोणी,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड.मिलिंद थोबडे उपस्थित होते.
यासमयी,सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश उदय लळित पुढे बोलताना म्हणाले की, सोलापूर ही माझी जन्मभूमी आहे.याठिकाणी माझे शालेय शिक्षण झाले. जन्मगांवाचे ऋणानुबंध कायम आहेत, इथले दोस्त व वर्गमित्र आजही संपर्कात आहेत.माझ्या वकिली व्यवसायामध्ये कुटुंब, मित्र व सोलापूरकरांचे मोठे योगदान आहे. माझ्या ३९ वर्षाच्या वकिली व्यवसातून उदंड किर्ती,मान व पैसा सर्व मिळाला. आता यापुढे सामाजिक बांधिलकीतून आहे ते समाजासाठी परत करायचे आहे,असे सांगून वकिलांना संबोधित करताना ते पुढे म्हणाले की, ग्रंथालय आणि पुस्तकांचा आधार घेवूनच आम्ही शिखर गाठले. सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यात तुम्हाला तर, संशोधन व अभ्यासासाठी प्रचंड साधने आहेत. युट्यूबवर सुद्धा वकिलांचा युक्तीवाद तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे सदैव सचोटीने काम करा, कक्षा भव्य आहेत.आज देशात निम्म्याहून जास्त संख्या युवकांची असून येणाऱ्या काळात युवकांच्या हातात देश असेल,असा आशावाद देशाचे सरन्यायाधीश उदय लळित यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे म्हणाले की,वकिलांनी न्यायालयात न घाबरता आपले कौशल्य पणाला लावून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून द्यावा. सोलापूरच्या मातीत जन्मलेल्या माणसाने न्याय व्यवस्थेत आपला ठसा उमटवल्याने आनंदाने सोलापूरकरांचा उर भरुन येतो. सोलापूरच्या ४ हुतात्म्यांनी स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य स्विकारले आणि ते सोलापूरचे ४ रत्न ठरले. अगदी त्याचप्रमाणे आणखी ४ रत्नांनी सोलापूरचे नांव उज्वल केले आणि ते ४ रत्न म्हणजे, न्या.उदय लळित,विनय जोशी,एन.जे.जमादार आणि आशुतोष कुंभकोणी हे आहेत, असे सांगून सर्वांनी सामाजिक न्यायासाठी योगदान द्यावे. बार कौन्सिलमधून खेड्यातील व मागास समाजातील वकिलांना मदत करावी, ज्यामुळे आपल्या जिल्ह्यातून आणखी एक मुख्य न्यायाधीश तयार व्हावा, अशी अपेक्षा यावेळी माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकूर दत्ता यांनी सरन्यायाधीश उदय लळित यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देवून ते न्यायालयात ताकदीने आपली बाजू मांडत व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देत,असे त्यांचे कौतुक केले. तसेच नवोदित वकिलांनी सर्व कायद्यांचा अभ्यास काळजीपूर्वक करुन कायदे जाणून घ्यावेत, श्रमाशिवाय आपले ज्ञान वाढणार नाही. जीवनाला महत्व देवून नम्रतेने भाषेवर प्रभूत्व वाढवावे,असा मोलाचा संदेश मुख्य न्यायाधीश दीपांकूर दत्ता यांनी यावेळी वकील वर्गाला दिला.
सोलापूरचा माणूस न्याय व्यवस्थेच्या मुख्य स्थानावर पोहोचला, याचा सार्थ अभिमान असून विनम्र स्वभाव,संयमी वृत्ती,कोणालाही अपशब्द न बोलता चौकटीबाहेर विचार करणारे हे सरन्यायाधीश उदय लळित यांचे मोठे गुण आहेत. त्यांचे हे गुण नवोदित वकिलांनी घ्यावेत व पैशासाठी वकिली करण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करा, असे आवाहन यावेळी राज्याचे महाधिवक्ता ॲड. आशुतोष कुंभकोणी यांनी केले. यावेळी ॲड.मिलींद थोबडे यांनी बार कौन्सिलची माहिती आणि बारच्या कार्याचा आढावा सांगितला. बार कौन्सिलतर्फे शिक्षण व इतर कार्यक्रमांची शिबीरे घेऊन नवोदित वकिलांना मार्गदर्शन करण्यात येत असून १५ वर्षात ५०० शिबीरे घेतली, ज्यांना बार आणि बेंचची आवड आहे त्यांना मार्गदर्शन केले.तसेच महिला दिनाला महिलांविषयी गुन्हे याबाबत शिबीर घेऊन जागृती केली. बार कौन्सिलचे डिजिटायझेशन केले असून सर्वांना यामार्फत सेवा दिली जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ई-गव्हर्नन्सचे प्रकाशन करण्यात आले.तसेच न्या.उदय लळित यांच्या हस्ते बार कौन्सिलच्या डिजिटायझेशनचे कळ दाबून लोकार्पण करण्यात आले.यावेळी, न्या.लळित कुटुंबातील सदस्य सविता लळित यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम, सरन्यायाधीश यांचे पिताश्री निवृत्त न्यायमुर्ती उमेश लळित,पत्नी अमिता लळित,श्रीमती झूमा दत्ता, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांचेसह वकिल वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^