इंडियन प्रेस क्लबच्या वतीने राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिवस साजरा

 

 

अक्कलकोट :

अक्कलकोट येथे इंडियन प्रेस क्लबच्यावतीने राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिवस साजरा करण्यात येवून वृत्तपत्र विक्रेता दिवसानिमीत्त वृत्तपत्र विक्रेत्यांना ब्रॅण्डेड कपड्यांचे मोफत वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे
अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे तर, प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन प्रेस क्लबचे राज्याचे अध्यक्ष शहाजहान आत्तार हे उपस्थित होते.

भारताच्या दक्षिण टोकावरील एका छोट्या खेड्यातला छोटा वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती असा विस्मयकारक प्रवास करणाऱ्या डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणजे, १५ ऑक्‍टोबर हा दिवस “राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहचविण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी “इंडियन प्रेस क्लबचे” जिल्हाध्यक्ष स्वामीनाथ हरवाळकर यांच्या पुढाकाराने हा राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिवस साजरा करण्यात आला. सोलापूर रोडवरील प्रेसिडेंट पॅलेसच्या सभागृहात समारंभपूर्वक हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी, प्रास्ताविक व स्वागत इंडियन प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष स्वामीनाथ हरवाळकर यांनी केले.

गेली चाळीस वर्षापासून वृत्तपत्र वाटण्याचे काम करणाऱ्या चाळीसपेक्षा अधिक वृत्तपत्र विक्रेत्यांना संपूर्ण रेमंड कंपनीचे पॅन्ट-शर्ट भेट स्वरुपात देण्यात आले. डॉ.कलाम यांची प्रेरणा म्हणजे, कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वयाच्या आठव्या वर्षी डाॅ.कलाम हे त्यांच्या चुलत भावाबरोबर वृत्तपत्र वितरणाचे काम करीत असत. वृत्तपत्र वितरणाच्या कामातून झालेल्या आपल्या पहिल्या-वहिल्या कमाईने जागृत केलेली आत्मसन्मानाची भावना आज पन्नास वर्षांनंतरही आपल्याला जाणवत राहते, असा उल्लेख डॉ.कलाम यांनी “विंग्ज ऑफ फायर’ या त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे.

यावेळी बोलताना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की, वृत्तपत्र वाटणाऱ्याचं जीवन अत्यंत खडतर असून त्यांच्यासाठी पेन्शन योजना शासनाने लागू करावी, यासाठी आपण लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासमयी बसवपीठ मुगळीच्या प्रमुख पूज्य महानंदाताई हिरेमठ यांनीही वृत्तपत्र वाटपाचं काम करणाऱ्या युवकांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा देऊन शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे आव्हान केले.

  यावेळी ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतीले, दैनिक पुढारीचे उपसंपादक जगन्नाथ हुक्केरी,अरुण जाधव,सुधीर माळशेट्टी, डॉ.रवींद्र बनसोडे, काशिनाथ मामा गोळे,नागेश कोनापुरे, अमरीश हरवाळकर,दत्ता हरवाळकर,आनंद खजूरगीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^