पशुधनाच्या वाढत्या चोर्यांमुळे शेतकरी हैराण : चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करा – डॉ.अनिकेत देशमुख
सांगोला :
सांगोला शहरासह ग्रामीण भागात भुरट्या चोर्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून जनावरे व मोबाईल चोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे.सांगोला तालुक्यात गेल्या कांही महिन्यांपासून खेडेगावातून जनावरे (पशुधन) चोरीचे प्रकार वाढत चालले असून पोलीसांनी चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा,अशी मागणी स्व.गणपतराव देशमुख यांचे नातू व शेकापचे युवकनेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी केली आहे.
सांगोला तालुक्यात मागील ३ ते ४ महिन्यांपासून शेतकर्यांच्या घरासमोरुन रात्रीच्या वेळी शेळ्या, मेंढ्या, बोकड,जर्सी पाडी,रेडी,म्हैस अशा किंमती पशुधनाच्या मोठ्या प्रमाणात चोर्या झाल्या आहेत. यासाठी चोरटे चारचाकी वाहनांचा वापर करीत असून त्यांचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश येत आहे.कायम दुष्काळाने ग्रासलेल्या सांगोला तालुक्यात शेतीसाठी लागणारे पाणी अपुरे असल्याने शेतकरीवर्ग पशुपालनासारखा पूरक व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह करत आहे.अनेक गरीब कुटुंबाचा प्रपंच केवळ शेळ्यामेंढ्यामुळे चालत आहे.
गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून शेळी,बोकड,म्हैस आदी जनावरांच्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. जनावरे चोरट्यांना जेरबंद करुन शेतकरी वर्गाला दिलासा देणे हे पोलिसांपुढील मोठे आव्हान असून वारंवार घडणार्या चोरीच्या घटनांमुळे सांगोला तालुक्यातील शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास गोठ्यातून तसेच शेतातून जनावरे चोरीला जात आहेत.जनावरे चोरणारी एक टोळीच कार्यरत असून तक्रार देण्यास गेल्यावर लवकर तक्रार घेतली जात नाही,अशा अनेक तक्रारी पशुपालक शेतकर्यांनी डॉ.अनिकेत देशमुख यांच्याकडे केल्या आहेत. त्यामुळे, जनावरांच्या चोरीच्या घटनेचा तपास योग्य पध्दतीने करुन पोलीसांनी चोरट्यांचा तात्काळ शोध घेवून त्यांना ताब्यात घ्यावे,अशी मागणी शेकापचे युवकनेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी केली आहे.
——————————————————————————