सांगोला :
चालूवर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने राज्यातील बहुतांशी भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर,कांही भागात अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले.जेंव्हा पाऊस पडायला पाहिजे,तेंव्हा तो पडला नाही आणि जेंव्हा नको आहे,तेंव्हा पडलेल्या या अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या अवकृपेमुळे नुकसानग्रस्त बनलेल्या शेतकरी वर्गावर किमान सरकारने तरी कृपा करुन त्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व शेकापचे युवानेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.
डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी या निवेदनात पुढे म्हंटले आहे की,शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर कांही पिके घेतली तर, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नसल्यामुळे रोजच्या रोज शेती मालाचे दर ढासळत असल्याने त्या पिकांच्या उत्पादनातून त्यांना हवा तेवढा मोबदला मिळत नाही. जनावरांच्या चाऱ्यासाठी मकेला मागणी असल्याने सध्या शेतकऱ्यांनी मक्याचे उत्पादन घेण्याकडे लक्ष दिले आहे. परंतु,अवकाळी पावसामुळे मका पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.शेती व्यवसायाला पूरक म्हणून दुध व्यवसाय करण्याच्या उद्देशाने सुमारे एक लाख ते दीड लाख रुपये किंमतीच्या गाई,म्हशी खरेदी केल्या तर इकडे,दुधाचे दर कमी झाल्याने पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्या गाई,म्हशी पुन्हा बाजारात विक्रीसाठी नेली तर, लाख ते दीड लाख रुपये किंमतीला घेतलेली गाय चाळीस ते पन्नास हजार रुपये तोट्यात विक्री करावी लागते.कर्ज काढून गायी खरेदी केल्या पण,दुधाचे दर कमी झाल्याने पशुपालक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला.परंतु त्यावरील उपाययोजनांची अंमलबजावणी शुन्य आहे. दुष्काळ जाहीर केलाच आहे तर,दुधाचे कमी झालेले दर ताबडतोब वाढवून कांही अंशी शेतकरी व पशुपालकांना मदत करणे गरजेचे आहे.दुधाच्या होणार्या कमी दरावर सरकारचा अंकुश असायला हवा. परंतु राज्य सरकार, याबाबत ठोस निर्णय घेताना दिसत नाही.कांही दिवसांपूर्वी दुध दराबाबत एक समिती गठीत केली त्याचा अहवालही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे दुधाचे दर कमी झाले तरी राज्य सरकार मूग गिळून गप्प का आहे ? असा सवाल डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
यापूर्वीही दुधाचे दर मनमानी पद्धतीने कमी केले असता, त्यावेळी, शेकापसह राज्यभरातील अनेक संघटनांनी दुध दर वाढीसाठी आंदोलने केली होती.परिणामी, सरकारने दुध दरवाढ करण्याचे निर्देश दिले होते. परंतु पुन्हा दुधाचे दर कमी झाल्याने शेतकरी कामगार पक्ष दुध दरवाढीसाठी पुन्हा रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असून निसर्गाची जरी अवकृपा झाली असली तरी किमान सरकारने तरी कृपा दाखवावी आणि या दुष्काळी व अवकाळी परिस्थितीवर लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना कराव्यात,अशी मागणी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व शेकापचे युवानेते डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केल्याची माहिती प्रसिध्दीप्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी दिली आहे.
—————————————————————————
निसर्गाने मारले तर मायबाप सरकारने तारले पाहिजे :
निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानग्रस्त बनलेल्या शेतकरी व कष्टकरी जनतेच्या नुकसान भरपाईची जबाबदारी सरकारने घेऊन त्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना आखल्या पाहिजेत. शेतकरी अडचणीत आला तर कष्टकरी व कामगार अडचणीत येतो.लहान,मोठे व्यावसायिकही अडचणीत येतात. त्यामुळे राज्य सरकारने अशा कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी तात्काळ खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
* अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या बागायती शेतीला हेक्टरी ५० हजार व जिरायतीला २५ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य द्यावे.
* पिक विम्याची रक्कम तात्काळ अदा करावी.अनेक शेतकऱ्यांना अद्यापही पिक विमा मिळत नाही व काहींचे हफ्ते थकीत आहेत,याचाही विचार सरकारने गांभीर्याने करावा.
* रेशन दुकानात मिळणाऱे अत्यावश्यक धान्य व घरगुती साहित्य हे योग्य पध्दतीने आणि महिन्याच्या शेवटपर्यंत वितरीत करावे.
* शेतकऱ्यांच्या विज बिलामध्ये सवलत देण्यात यावी.
* दुधाला चांगला दर देण्यात यावा.——————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने