सांगोला :
सतत दुष्काळात होरपळणाऱ्या सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा व पिकांना अवकाळी पावसाने झोडपल्याने सांगोला तालुक्यातील डाळिंब,द्राक्ष,आंबा इ.फळबागांचे तसेच ज्वारी,गहू,मका व पालेभाज्या या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून नुकसानग्रस्त झालेल्या फळबागा व पिकांचे सरसकट पंचनामे करुन सर्व शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी केली आहे.
सांगोला शहर व तालुक्याला गेल्या ३ ते ४ दिवसांपासून सलग अवकाळी पावसाने झोडपल्याने डाळिंब,द्राक्ष व आंबा या फळबागांचे तसेच रब्बी हंगामातील ज्वारी,मका यासह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस,वादळी वारे यामुळे,शेतातील उभी पिके कोलमडून पडली.तर,द्राक्ष पिकांना घडकुज कुजवा रोगांचा प्रादुर्भाव वाढला,यामुळे नुकत्याच प्राथमिक अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागा या उद्ध्वस्त झाल्या आहेत.मोहोर आलेल्या आंब्याच्या बागांनाही ढगाळ वातावरण,अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. मोहोर गळून गेल्याने आंबा उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे आणि डाळिंब पिकालाही अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे.
चालूवर्षी सांगोला तालुक्यात सरासरी पेक्षाही कमी पाऊस झाल्याने दुष्काळ जाहीर झाला असून आधीच दुष्काळी परिस्थितीशी झगडत व्याजाने पैसे काढून लाखो रुपयांची महागडी औषधे,खते व बियाणे खरेदी करुन कशाबशा जतन केलेल्या फळबागा या अवकाळी पावसाने उध्वस्त केल्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभा राहिले आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून कोणत्याही जाचक अटी व शर्ती न घालता सरसकट पंचनामे करुन भरपाई द्यावी अन्यथा, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्याला प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल,असा इशाराही शेवटी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी दिला आहे.
——————————————————————————
दूध दरात घसरण त्यातच, अवकाळीचा तडाखा :
संपूर्ण सांगोला तालुक्याची अर्थव्यवस्था ही शेती व पशुपालन या दोन व्यवसायांवर अवलंबून आहे. आधीच दुधाच्या दरात प्रति लिटर तब्बल ८ ते १० रुपयांची घसरण झाली आहे.त्यामुळे,शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे आणि अशातच सांगोला तालुक्यातील फळबागा व पिकांना अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने शेतकऱ्यांसमोर “दुष्काळात तेरावा महिना” अशी परिस्थितीत निर्माण झाली आहे. अशावेळी शासन व प्रशासन दोघांनीही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणे गरजेचे आहे.
– माजी आमदार दीपकआबा
——————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने